अमेरिका-इराण युद्धामुळे पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाचा जगाला मोठा फटका बसत आहे. कारण होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या व्यापाराला अडथळे निर्माण होत असल्याने अनेक देशांत इंधन पुरवठ्याची साखळी विस्कळीत होत आहे. याचा फटका भारताला देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार अधिक सावध भूमिका घेत उपाययोजना राबवत आहे. या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधन बचतीचं आवाहन केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या काटकसरीच्या आवाहनानंतर आता देशभरात अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं दिसून आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वत:च्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील निम्म्याने कमी केली आहे. त्यानंतर अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवरच महाराष्ट्र सरकारने देखील अंमलबजावणी करत मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी केली आहे.

Devendra Fadnavis bike to Vidhan Bhavan
मुख्यमंत्री फडणवीस बाईकवरून विधानभवनात दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: बाईकवरून विधानभवनात दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकारने देखील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरही निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आता राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी झाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस दुचाकीवरून विधानभवनात दाखल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार हे आज दुचाकीवरून थेट विधानभवनात दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री आशिष शेलार यांना असलेले सुरक्षा रक्षक देखील दुचाकीवरून प्रवास करताना पाहायला मिळाले आहेत.

मंत्री, अधिकारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर राज्यातील महायुती सरकारने दैनंदिन कारभारात दैनंदिन खर्चात काटकसर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील मंत्री आणि सचिव आता प्रवासासाठी मेट्रो व अन्य सार्वजनिक वाहनांचा वापर करणार आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारपासून इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास करण्यास सुरुवात केली आहे. तसेच ताफ्यातील सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर इंधनावर धावणाऱ्या ताफ्यातील वाहनांमध्येही कपात करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

PM Modi fuel conservation appeal May 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंचा इलेक्ट्रिक वाहनाने प्रवास

शिंदे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रप्रथमची घोषणा केली. त्यामुळे मी स्वत: इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला. माझ्या ताफ्यातील सुरक्षा विषयी आवश्यक वाहने आहेत, तितकीच वाहने ताफ्यात राहतील. ताफ्यातील जितकी वाहने कमी करता येतील. तितकी वाहने कमी करता येतील. इतर मंत्र्यांना देखील इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास सांगितलं आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मंत्री नितेश राणे यांच्याकडून ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनाचा समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनानंतर मंत्री नितेश राणे यांनी देखील त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश ताफ्यात केला आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पर्यावरणपूरक वाहतुकीच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, वैयक्तिक तसेच शासकीय ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करून इंधन बचतीच्या दृष्टीने इलेक्ट्रिक वाहन सेवेत दाखल केलं आहे.”

अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांच्याही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील त्यांचा ताफा जवळपास निम्म्याने कमी केला आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी देखील त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी केली आहे.

PM Modi fuel conservation appeal May 2026
अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांच्याही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी

मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्याही निम्म्याने कमी

पंतप्रधान मोदी यांनी जनतेला इंधन बचत करण्याचं आवाहन केलं. त्या आवाहनाची सुरूवात पंतप्रधान मोदींनी स्वत:पासून करण्यास सुरूवात केली आहे. मोदी यांनी त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी करण्याचे निर्देश एसपीजीला (SPG) दिले. त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार त्याबाबत एसपीजीकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे.

PM Modi fuel conservation appeal May 2026
पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्याने कमी

पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केलं होतं?

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचं आवाहन केलं. इंधनाची बचत करणं आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणं ही आपली जबाबदारी असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. मोदी म्हणाले होते की, “आपण पेट्रोल, गॅस आणि डिझेलचा वापर कमी केला पाहिजे. शेजारील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनेक पटींनी वाढल्या आहेत. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नसल्यामुळे या जागतिक संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या शहरांमध्ये मेट्रो आहेत, तिथे लोकांनी मेट्रोचा वापर केला पाहिजे. आज आपल्याला बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि वर्क फ्रॉम होम या सारख्या उपाययोजनांची गरज आहे.”

पंतप्रधान मोदींनी कोण-कोणती आवाहनं केली आहेत?

-शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या.
-वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा.
-सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करा.
-पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा.
-स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा.
-रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा.
-स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा.
-वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा.