Rahuri Bypoll Election : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना भाजपाने राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे रिंगणात उतरणार असल्याची मोठी चर्चा होती आणि त्यांनी त्यासाठी तयारीही केली होती. मात्र, आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली.
या भेटीवेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांची बंद दाराआड चर्चा झाली आणि त्यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. मात्र, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून प्राजक्त तनपुरे यांचं मन वळवलं असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर फेसबुकवर एक पत्र लिहित याबाबत सविस्तर भाष्य केलं.
प्राजक्त तनपुरेंनी काय म्हटलं?
“आपल्या राहुरी तालुक्याचे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्याचा ध्यास मनात ठेवून मी या विधानसभा पोटनिवडणुकीकडे पाहत होतो. याच जाणिवेतून राहुरीच्या विकासासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, युवकांच्या स्वप्नांसाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी मी ही पोटनिवडणूक लढविण्याचा निर्धार केला होता. परंतु, आज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी माझी भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली. या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले. राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या आणि मला समाधान आहे की त्या सर्व मुद्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.

“जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला, तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही, असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यांच्या या विनंतीचा मान राखत आणि स्व. शिवाजीराव कर्डिले यांना आदरांजली अर्पण करत मी ही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. पण हा निर्णय म्हणजे आपली लढाई थांबली असा अजिबात अर्थ नाही. आपण दोन पावले मागे घेतली आहेत. पण आता त्यानंतर चार पावले पुढे जाण्याची तयारी आहे. राहुरीच्या विकासाची, आपल्या हक्काची ही लढाई अशीच सुरू राहील अधिक ताकदीने, अधिक निर्धाराने”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.
“या संपूर्ण प्रवासात माझे कुटुंबीय, हितचिंतक आणि माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आपण सर्व कार्यकर्ते ज्या ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, त्या प्रत्येकाचा मी मनापासून ऋणी आहे. तुमचा विश्वास, तुमचं प्रेम, आणि तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे. यापुढील काळात देखील आपण असेच प्रेम द्याल व माझ्या पाठीशी उभे रहाल हा विश्वास आहे”, असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलं आहे.
