स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित करण्यात आलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाच्या कंपनीने राज्य सरकारशी गुंतवणुकीचा करार केला. यावरून चांगलीच टीका झाल्याचे पाहायला मिळाले होते. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे.
दावोस येथे राज्याचे मंत्री आणि भाजपा नेते मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाची कंपनी लोढा डेव्हलपर्स लिमिटेडशी महाराष्ट्र सरकारचा सामंजस्य करार झाला. डेटा सेंटर्स क्षेत्रात १ लाख कोटींच्या गुंतवणुकीतून १.५० लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोशल मीडिया हँडलवर केली होती. लोढा डेव्हलपर्सबरोबर केलेल्या करारानंतर काँग्रेससह विरोधकांनी भाजपावर टीका केली होती.
फडणवीस नेमकं काय म्हणाले?
या करारावर झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. विधानसभेत बोलताना फडणीस यांनी करार केला ते फक्त मंत्री लोढा यांचे सुपुत्र नाहीत, ते एक नामांकित उद्योजक असल्याचे नमूद केले. ते म्हणाले की, “आमच्या लोढांजींच्या मुलासोबत आम्ही एक करार केला, त्यावर अनेकांनी म्हटलं की लोढा हे तुमच्या मंत्रिमंडळातच आहेत. इथेच बसून त्यांच्याशी करार का नाही केला? बरोबर आहे, इथे बसूनही त्यांच्याशी करार करता आला असता… पण पहिली गोष्ट तर, त्यांचे सुपुत्र हे काही केवळ त्यांचे सुपुत्र नाहीत, तर महाराष्ट्र आणि देशातील एक अग्रगण्य उद्योजक आहेत.”
पुढे बोलताना लोढा यांच्या मुलाच्या कंपनीबरोबर झालेल्या कराराबद्दल स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, “आपण एक लाख कोटींचा करार केला आहे. ही गुंतवणूक कोण करणार आहे? लोढांचे काम काय आहे? लोढांचे काम आहे, जागा आणि सर्व व्यवस्था करणे. वीज आणणे, पाणी आणणे हे त्यांचे काम आहे. गुंतवणूक कोण करणार आहे? अॅमेझॉन, एचटीटी, मायक्रोसॉफ्ट, एनटीटी…. म्हणजे जगातील सगळ्यात मोठ्या डेटा सेंटर कंपन्या गुंतवणूक करणार आहेत. म्हणून त्यांच्याबरोबर करार केला आहे. हा लोढांसोबतचा करार नाही. लोढांनी त्यांच्या वतीने केलेला करार आहे. या सगळ्या कंपन्यांची गुंतवणूक त्यामध्ये आहे,” असे देवेंद्र फडणीस म्हणाले.

