मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी भाजपाला धार्जिणे निर्णय़ घेतल्याची बातमी समोर आली. ज्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. ४ ऑक्टोबरला होणाऱ्या मोर्चाबाबत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत ठाकरे बंधूंचा मोर्चा ४ ऑक्टोबरला निघणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

“लोकशाहीत आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. कोण आंदोलन करतं आहे त्यावर मी टीका करणार नाही. फक्त ज्या मुद्द्यांवर आंदोलन करतो आहोत तो मुद्दा किती खरा आहे हे समजून घेतलं पाहिजे किंवा आपण जी उदाहरणं देतो ती उदाहरणं किती खरी आहेत हे पण समजून घेतलं पाहिजे. मला वाटतं यापेक्षा जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांचं आंदोलन झाल्यावर त्यावर योग्य प्रतिक्रिया दिली जाईल.”

राज ठाकरे यांचा भाजपाला टोला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात ठाकरे बंधूंचा मोर्चा ४ ऑक्टोबरला निघणार आहे. हा मोर्चा भायखळ्यातील रिचर्डसन क्रुडास कंपनी ते मुंबई महापालिका इथपर्यंत निघणार आहे. सकाळी १० वाजता मोर्चाला सुरूवात होईल. त्यानंतर ११ ते ११.३० च्या दरम्यान मुंबई महापालिकेच्या जवळ या मोर्चाचं रूपांतर सभेत होईल अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली आहे. निवडणूक आयुक्तांबाबत जे काही सांगितलं जातं आहे ते कपोलकल्पित आहे असं भाजपाने म्हटलं आहे. दरम्यान याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता राज ठाकरे म्हणाले आम्ही जर का निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढत असू तर मग भाजपाला काय त्रास होतो आहे? मराठीत एक म्हण आहे खाई त्याला खवखवे असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपाला टोला लगावला आहे.

राज ठाकरे आणखी काय म्हणाले?

आम्ही जो मोर्चा काढतो आहोत तो निवडणूक आयोगाच्या विरोधातला मोर्चा आहे. २०१७ आणि २०१८ मध्येही मी अनेक नेत्यांना भेटलो होतो. ईव्हीएमच्या संदर्भातही मी चर्चा केली होती. ४ ऑक्टोबरला याबाबतची सगळी सविस्तर भूमिका आम्ही मांडू. ४ ऑक्टोबरच्या मोर्चानंतर पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू. सर्वच राजकीय पक्षांना आम्ही या मोर्चासाठी आमंत्रण देत आहोत. उद्या सत्ताधारी पक्षातल्या लोकांनाह जरी या व्यासपीठावर यायचं असेल तर ते येऊ शकतात. हा कुठलाही राजकीय पक्षाच्या विरोधापेक्षा निवडणूक आयोगाचा जो काही गेल्या वर्षांतला कारभार आहे त्याविरोधातला मोर्चा आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.