मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी मागील काही दिवसांपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलेलं आहे. मात्र, त्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने अद्याप कोणताही ठोस तोडगा काढलेला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण अंमलबजावणीच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे काय म्हणाले?

आज (१२ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “आता मला खिंड लढू द्या. आता मी एकटा लढतो. जेव्हा रस्त्यावरील काटे संपतील तेव्हा मी तुम्हाला (मराठा समाजाला) सांगतो, केव्हा मुंबईला यायचं. आता यामागचं कारण सांगतो. पहिला मुद्दा म्हणजे उद्या (१५ सप्टेंबर) मी एकटाच मुंबईला निघणार आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही येऊ नका. पण तुम्ही ज्या गाड्या लावल्या आहेत, वर्गणी करून तुम्ही जे वाहनं लावलेले आहेत, ते सध्या जशाच्या तसंच ठेवा, त्या वर्गणीमधील पैसे देखील खर्च करू नका”, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“जवळजवळ सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. काही मागण्या अशा आहेत ज्या न्यायालयात आहेत, विविध टप्प्यांमध्ये आहेत. आम्ही तेदेखील अवगत केलं आहे की इतर संवैधानिक पद्धती आहेत किंवा कोर्ट आहे त्याशिवाय या मागण्या मान्य केल्या जाऊ शकत नाहीत. आम्ही चर्चेची दारं कधीही बंद केलेली नाहीत. जे संविधानात म्हटलं आहे, राज्यघटनेत आहे ते आम्ही करायला तयार आहोत. ज्या गोष्टी कोर्टाने आखून दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्हाला करता येणार नाहीत. मला वाटतं की गणेशपर्व सुरु असताना मुंबईत आंदोलन करणं, गणेशभक्तांना असुविधा होणं हे कुणासाठीच योग्य नाही. या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे.”

मनोज जरांगे यांचा मुंबईला जाण्याचा मार्ग कसा असेल?

मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून १५ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेने निघतील. चार ठिकाणी मुक्काम करत पाचव्या दिवशी ते मुंबईत दाखल होतील.

१५ सप्टेंबर : पहिला मुक्काम पाटोदा (जि.बीड).

१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम श्रीगोंदा (जि.अहिल्यानगर).

१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम हडपसर (पुणे).

१८ सप्टेंबर : चौथा मुक्काम खोपोली (रायगड).

१९ सप्टेंबर : रोजी मुंबईच्या आझाद मैदानात दाखल होतील.

पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली?

मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे निघणार असून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.