मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत असताना सत्ता केवळ येऊन चालत नाही ती अंगात आणि मनात असावी लागते. भाजपा अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर आलेला नाही असं म्हणत टीका केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंनी भाजपावर काय टीका केली होती?

“भाजपाकडून संविधान आणि लोकशाही वाचवण्याच्या काढलेल्या रॅलीवर टीका करत राज ठाकरे यांनी भाजपने लोकशाही वाचवा असे म्हणणे केंटुकी फ्राइड चिकनच्या प्रतीक असलेल्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा असे सांगण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला. स्वत:च सत्तेत बसलेले असताना लोकशाही वाचविण्यासाठी मोर्चे नेमके कशासाठी आणि कोणाविरुद्ध काढत आहात”, असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी विचारला होता. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंना उत्तर देत मुख्यमंत्री काय म्हणाले?

आमचे मोर्चे कशासाठी आहेत हे जर राज ठाकरेंनी समजून घेतलं तर कदाचित ते अशा पद्धतीने बोलणार नाहीत. आमचे मोर्चे हे अराजकतेच्या विरोधातले मोर्चे आहेत. संविधान वाचवण्यासाठी हे मोर्चे आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडी व्यवस्था परिवर्तन (रेजीम चेंज) करण्याचा प्रयत्न करते आहे. त्याविरोधात हे मोर्चे आहेत. कारण रेजीम चेंजचा अर्थ संविधान बदलणे हाच असतो. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आम्हीही रस्त्यावर येऊ शकतो. राहुल गांधी जेवढे लोक घेऊन येतात त्यापेक्षा जास्त लोकांचं समर्थन हे भारतीय संविधानाला आहे. भारतीय लोकशाहीला आहे आणि भारतीय संविधानाला आहे. असं म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या अग्रीम मदतीबाबत काय सांगितलं?

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून ५ हजार रूपये देण्याचं आपण मंजूर केलं होतं. ७३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहचले आहेत. पुढील दोन दिवसांत ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोहचतील. ५ टक्के थोडे मागेपुढे होतात पण ते पैसेही मिळतील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जी आहे त्या अंतर्गत ४ लाख ८६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४ हजार ७६४ कोटी रूपये जमा केले आहेत. जे पैसे जमा करण्यात आले त्यातले सर्वाधिक शेतकरी मराठवाड्यातले आहेत. २१ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे आपण आत्तापर्यंत भरले आहेत अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर दिली. तसंच मी आणि मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे की आम्ही दिवाळी शेतकऱ्यांसह साजरी करणार त्या दृष्टीने आम्ही पुढची पावलं उचलत आहोत अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.