Tapovan Tree Cutting Controversy: पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासन कामाला लागलं आहे. राज्य सरकारच्या पातळीवरूनदेखील कुंभमेळ्याच्या तयारीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. मात्र, याच तयारीचा एक भाग म्हणून नाशिकच्या गर्द झाडी असलेल्या तपोवनात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्याचा मुद्दा सध्या चर्चेत आला आहे. कुंभमेळ्याला येणाऱ्या साधूंच्या मुक्कामासाठी तपोवनातील गर्द झाडी तोडून तिथे साधुग्राम बांधण्याचा निर्णय सरकारी पातळीवरून घेण्यात आला आहे. याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असला, तरी तपोवनात वृक्षतोड करण्यावर सरकार ठाम असल्याचे संकेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केलेल्या विधानावरून मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तपोवनाबाबत काय म्हणाले?
मुंबईत आज ऑरेंज गेट टनेलच्या कामासाठी टनेल बोअरिंग मशीनच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मेट्रो प्रकल्पातील इतर पदाधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना देवेंद्र फडणवीस यांनी तपोवनातील वृक्षतोडीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
“कुंभमेळा आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. तसंच पर्यावरणही महत्त्वाचं आहे. आमचं कुणाचंही असं मत नाही की झाडं तोडली गेली पाहिजेत. पण यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. प्रयागराजला जिथे कुंभमेळा होतो, तिथे १५ हजार हेक्टर जागा आहे. आपला कुंभमेळा नाशिकला ज्या साधुग्रामला शतकानुशतके होत आहे, तिथे ३०० ते ३५० एकर जागा आहे. २०१५-१६ चा गुगल मॅप बघितला, तर तेव्हा यातलं कुठलंच झाड तिथे दिसत नाही. महाराष्ट्र सरकारने ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला, तेव्हा नाशिक महापालिकेनं ही झाडं लावली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वृक्षांच्या दाटीमुळे साधुग्रामचं बांधकाम अशक्य
“आता तिथे साधुग्राम तयार करता येत नाही कारण वृक्षांची दाटी तिथे निर्माण झाली आहे. तिथे झाडं कापूच नये किंवा कमीत कमी झाडं कापली जावी, कापल्या जाणाऱ्या झाडांची पुनर्लागवड कशी करता येईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काही लोकांनी विनाकारण अॅक्टिव्हिजम सुरू केलाय – फडणवीस
दरम्यान, तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्यांवर देवेंद्र फडणवीसांनी यावेळी टीका केली. “यावर काही लोकांनी विनाकारण अॅक्टिविजम सुरू केला आहे. काही लोक राजकीय कारणानेदेखील पर्यावरणवादी बनले आहेत. कुंभमेळा निसर्गाशी साधर्म्य साधणाऱ्या आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. त्यामुळे यातून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही असा मार्ग आम्ही काढू. पण काही लोकांना असं वाटत असेल की कुंभमेळ्यात अडथळेच यावेत, तर असे अडथळे आम्ही येऊ देणार नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.
