Devendra Fadnavis On Lockdown : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अद्यापही हे युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही. या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलासह नैसर्गिक वायूचा तुटवडा निर्माण होत असल्याचा दावा केला जात आहे. तसेच मध्य पुर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर लॉकडाऊनबाबत काही अफवा पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे.
त्यामुळे बाजारपेठांत आणि शहरांमधील छोटे दुकानदार लॉकडाऊनच्या चर्चेने चिंतेत आहेत. एवढंच नाही तर या लॉकडाऊनच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत लॉकडाऊन लागणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच अशा प्रकारे लॉकडाऊन लागणार अशा अफवा पसरवल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
“लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे. मात्र, जे लोक अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत त्या सगळ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल. मी स्पष्टपणे सांगतो की अशा प्रकारची खोटी माहिती सोशल मीडियावर शेअर करणं किंवा अशा खोट्या पोस्ट व्हॉटसअॅपच्या माध्यमातून शेअर केल्या तरी तो गुन्हा ठरेल. अशा गुन्ह्यातील प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की लॉकडाऊनबाबत खोट्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल”, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे.
लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारने काय म्हटलं?
लॉकडाऊनच्या अफवेवर बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत याबद्दल अधिकृत भूमिका मांडली. ते म्हणाले, “भारतात लॉकडाऊन होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. भारत सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अशा परिस्थितीत जर कुणी अफवा पसरवून घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते बेजबाबदार आणि हानिकारक कृत्य आहे. जागतिक परिस्थिती सध्या अनिश्चित असली तरी आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी आणि महत्त्वाच्या उत्पादनांशी निगडित परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक बाबींचा योग्य पुरवठा होईल याची काळजी घेत आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय ऊर्जा पुरवठा सुरू आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण तयार आहोत.”
