CM Devendra Fadnavis on Rohit Pawar: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमानाने जात असताना विमान कोसळल्यामुळे त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे संबंध राज्याला धक्का बसला होता. अपघातानंतर अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे सातत्याने अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. यासाठी त्यांनी काही पत्रकार परिषदाही घेतल्या. यावर नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट उत्तर दिले आहे.
एबीपी न्यूज नेटवर्कच्या आयडियाज ऑप इंडिया या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत संपन्न झाली. या मुलाखतीदरम्यान रोहित पवार व्यक्त करत असलेल्या संशयासंबंधी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या दुर्घटनेचा तपास डीजीसीए कडून सुरू आहे. आम्ही सीआयडीलाही तपास करण्यास सांगितले. अजित पवारांच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर सीबीआयलाही तपास करण्याची विनंती केली आहे. ज्यांच्या ज्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी डीजीसीएला त्या पाठवून त्याबद्दलचे उत्तर मागावे, असे आम्ही सांगितले आहे.
रोहित पवारांबाबत म्हणाले…
रोहित पवार यांनी डीजीसीएविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करत आधी मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि नंतर बारामतीमधील ग्रामीण पोलीस ठाणे गाठले होते. मात्र दोन्ही ठिकाणी डीजीसीएविरोधात एफआयआर घेतला गेला नाही. रोहित पवारांबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “रोहित पवारांनी माझी भेट घेऊन मला पत्र दिले आहे. त्यांच्या पत्राबरोबर माझे पत्र जोडून ते डीजीसीएला पाठवणार आहे आणि त्यावर चौकशीची मागणी करणार आहे.”
घातपाताची शक्यता वाटते का?
अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता वाटते का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत चौकशी सुरू आहे, तोपर्यंत कोणतेही अंदाज बांधणे योग्य नाही. हे संवेदनशील प्रकरण आहे. जो व्यक्ती मृत्यू पावला त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचाही आपल्याला विचार करावा लागतो. या विषयावर पतंगबाजी करणे किंवा हवेत गोळ्या मारण्याचा प्रकार मी करणार नाही.”
रोहित पवारांच्या तीन प्रमुख मागण्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताना रोहित पवार यांनी तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे अजित पवार यांच्या विमान अपघाताची सर्वंकष, पारदर्शक आणि सखोल चौकशी करावी. दुसरी मागणी म्हणजे अजित पवार यांचा सहवास लाभलेल्या ‘देवगिरी’ बंगल्याचे संग्रहालय व स्मारकात रूपांतर करावे, तसेच राज्यातील काही महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि महामार्गांना त्यांचे नाव द्यावे. तिसरी मागणी म्हणजे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, तसेच त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या आश्रितांना आवश्यक ती मदत करावी.
