Devendra Fadnavis On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरण राज्यभर गाजलं आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं आहे. सध्या भोंदू खरात कोठडीत असून त्याची एसआयटीद्वारे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरात प्रकरणाबाबत आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

भोंदू अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १२ गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू आहे. अशोक खरातच्या संपत्तीची आणि गैरव्यवहारांची चौकशी केली जाईल. अशोक खरात प्रकरणात काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मी स्पष्ट सांगतो की अशा प्रकरणाबाबत सरकारला जे करायला पाहिजे ते सरकार करत आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

खरात प्रकरणात आतापर्यंत किती गुन्हे दाखल झाले?

“अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत आणि दररोज नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एसआयटी रोज काय तपास करते हे रोजच सांगता येणार नाही. पण एसआयटी योग्य वेळी या प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देईल. त्यामुळे मला वाटतं की सर्वांनी एसआयटीवर विश्वास ठेवावा. एसआयटी उत्तम काम करत आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अशोक खरातची ईडी चौकशी होणार का?

अशोक खरात प्रकरणातील सर्व व्यवहारांची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “खरात प्रकरणातील व्यवहारांबाबत नक्कीच ईडी चौकशी होणार आहे. त्याबाबत ईडीने या गोष्टीची माहिती घेतली आहे. ईडीनेही त्यांची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा खरातच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती समजली की नियमानुसार जे-जे करावं लागेल ते आम्ही करणार आहोत”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

सीडीआर कोणी लीक केला? चौकशी होणार

“अशोक खरात प्रकरणातील सीडीआर कोणालाही प्राप्त करून घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार फक्त ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांनाच तो अधिकार आहे. मात्र, या प्रकरणातील सीडीआर कसा लीक झाला? तो सीडीआर कोणी लीक केला? या संदर्भातील चौकशी राज्य सरकार करणार आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त आरोप-प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरोधात सबळ पुरावा असेल त्यांच्यावर कारवाई होईलच. मात्र, कोण-कोणाशी बोललं या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टम चालत नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.