Devendra Fadnavis On Ajit Pawar : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराच्या माध्यमातून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राजकीय नेत्यांमध्ये टीका-टिप्पणी सुरू असल्यामुळे राजकारण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं. ‘मी आतापर्यंत संयम पाळला, पण अजित पवारांचा संयम ढळलाय’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांनी भाजपावर केलेल्या टीकेवर बोलताना म्हटलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “देवाभाऊ काही बोलत नाही, देवाभाऊचं काम बोलतं.” तुम्ही म्हणता तुमचं काम बोलतं, मग अजित पवार सारखी टीका का करतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, “अजित पवार हे बोलतात, पण माझं काम बोलतं. मात्र, मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या निवडणुकीत आमच्या हे लक्षात आलं होतं, की पुणे असेल किंवा पिंपरी-चिंचवड, या ठिकाणी आम्ही युतीत लढू शकत नाहीत. कारण आमच्या पक्षांची मोठी ताकद आहे. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आपण वेगवेगळं लढायचं.”
“मी असं सांगितलं होतं की आपण ज्या ठिकाणी वेगवेगळ लढत आहोत, त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहोत असं समजून एकमेकांवर टीका करायची नाही. मी आत्तापर्यंत तो संयम पाळला, पण अजित पवारांचा संयम ढळला. कदाचित निवडणुकीतील परिस्थिती पाहून अजित पवारांचा संयम काहीसा कमी झालेला मला दिसतोय. त्यामुळे ते बोलत आहेत. पण १५ तारखेनंतर अजित पवार बोलणार नाहीत असा विश्वास आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस पुण्यातून निवडणूक लढवणार? स्वत:चं केला खुलासा
आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातून निवडणूक लढणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “या ठिकाणी मुरलीधर मोहोळ बसलेत, दादा (चंद्रकांत पाटील) या ठिकाणी बसलेत. आमचं चांगलं चालंलय, नागपूरकरांचं माझ्यावर मनापासून प्रेम आहे. सहा-सहा वेळा त्यांनी मला निवडून दिलं आहे. त्यामुळे पुण्यावर फक्त प्रेम ठेवायचं, पण निवडणूक नागपूरमधूनच लढवायची आहे”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
“अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही…”; फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांनी भाजपावर टीका केली होती. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. फडणवीस म्हणाले की, “मी युतीचा धर्म पाळला, पण अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. अजित पवारांनी जी वक्तव्यं केली ती वक्तव्यं मला पटलेली नाहीत. पण मी त्याचा प्रतिवाद केलेला नाही. या निवडणुकीत मी पहिल्या दिवशी पासून ठरवलं होतं की मित्र पक्षांवर टीका करणार नाही. ती मी केली नाही. दुसरं ठरवलं होतं की मी कुठल्याही नेत्यावर टीका करणार नाही. विकासावर बोललं नाही तर लोकांना हे वाटू शकतं की आम्ही दुर्बल आहोत. पुणे- पिंपरीत मी युतीचा धर्म पाळला. अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही.” असं म्हणत फडणवीसानी नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाराजीच्या वक्तव्यावर अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी युती धर्म पाळला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी कुठे टीका केली. जर मी या ठिकाणी महापालिका निवडणूक लढवतोय, तर मग ९ वर्षांत येथे काय चुका झाल्या ते सांगायचं नाही का? चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं होतं का? मी चुका पुराव्यानीशी दाखवतोय. पहिल्या पत्रकार परिषदेत देखील मी सांगितलं, त्यानंतर सांगितलं आणि आजही तेच सांगतोय”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
