घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती ६० रुपयांनी वाढल्या आहेत. येत्या काळात इंधन तुटवडा निर्माण होईल अशी स्थिती येऊ शकते असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, लोकांमध्ये चुकीची माहिती देऊन माध्यमांनी पॅनिक तयार करू नये, भारत सरकारने अतिशय स्पष्टपणे या संदर्भातली भूमिका मांडली आहे. भारताच्या एनर्जी सिक्युरिटीच्या संदर्भात कशाप्रकारे मोदीजींनी पाऊल उचलली आहेत हे आपल्यासमोर आलेलं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत ६० रुपयांची वाढ

अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून, त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे, आणि याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक १५० ते २०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिला आहे. दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरातही ६० रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घराचे गणित बिघडले आहे. त्यातच, गॅस सप्लायही काही शहरांत बंद पडल्याचे पाहायला मिळते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता, असा कुठलाही प्रकार नाही, माध्यमांनी लोकांना पॅनिक करू नये, भारत सरकारने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे, असे सांगितले.

लोकांमध्ये कुठलाही पॅनिक तयार करु नका-फडणवीस

“मी आपल्या सगळ्यांना सांगतो, लोकांमध्ये पॅनिक तयार करु नका. भारत सरकारने अत्यंत स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. एनर्जी सिक्युरिटीसंदर्भात मोदींनी कशी पावलं उचलली आहेत हे आपल्या समोर आलं आहे. दोन तीन दिवस झाले काही माध्यमांनी चालवून दिलं की पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार, विनाकारण मोठमोठ्या रांगा पाहण्यास मिळाल्या. भारत सरकारने सांगितलं की अशी कुठलीही स्थिती निर्माण होणार नाही. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती आहे. जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्यासाठी भारत मोदींच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष कार्यक्रमाबाबत काय म्हणाले?

“महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने ग्रामीण भागातील महिला प्रतिनिधी आहेत त्यांचा नारीशक्ती संगम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी मी भाईंदरमध्ये आलो होतो. शासनाच्या योजना राज्यातील महिलांपर्यंत योजना कशा पोहचवता येतील, शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशा नेता येतील याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचं औचित्य असं आहे की मुथ्थुलक्ष्मी रेड्डी या पहिल्या महिला प्रतिनिधी होत्या. त्यांच्या निवडीला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.