शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद सर्वांना माहिती आहेत. दोन्ही नेते सार्वजनिक व्यासपीठावरून एकमेकांवर आरोप करत आले आहेत. दरम्यान नुकतेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मिश्किल विधान केले आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असले तरी अनेकदा ते एकमेकांवर शाब्दिक कोट्या करताना दिसतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकरेंबद्दल अशीच एक मजेशीर प्रतिक्रिया दिली. रात्री दोन वाजता उद्धव ठाकरेंचा फोन आला तर तुमची काय प्रतिक्रिया असेल? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

रात्रीच्या दोन वाजता जर तुम्हाला एका प्रायव्हेट नंबरवरून फोन आला आणि तुम्ही तो उचलला, दुसरीकडून फोनवर उद्धव ठाकरे असतील, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर फडणवीस यांनी मिश्किल शब्दांत उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले. फडणवीस म्हणाले की, ‘रात्रीच्या दोन वाजता उद्धव ठाकरे फोन करू शकत नाहीत, कारण ते लवकर झोपी जातात’. इतकेच नाही तर पुढे फडणवीस म्हणाले की, “आणि जर त्यांचा फोन येणार आहे असे मला आधीच माहिती असेल तर मी ‘दोस्त दोस्त ना रहा’ ही रिंगटोन लावून ठेवेल.”

ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही?

ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी तर जो मुंबईचा मराठी माणूस आहे, तो देखील हे पाहतो आणि विचार करतो की त्यांनी काय काम केलं. गेल्या ३० वर्षांत मुंबईतील मराठी माणसांना उद्धव ठाकरेंनी काय दिलं? काहीही दिलेलं नाही. मी तर हे म्हणतो की गेल्या १५ वर्षांत उद्धव ठाकरे हे स्वत: मुंबईच्या महापालिकेत लक्ष घालत आहेत, मग मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासाबाबत बोलले तर मी १०० रुपये देईल. त्यानंतर मी माझ्या बक्षीसाची रक्कम ३ हजारांपर्यंत वाढवली, तरी देखील उद्धव ठाकरे मुंबईच्या विकासाबाबत काहीही बोलले नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एवढंच नाही तर मी त्यांना आणखी एक खुलं आव्हान दिलं होतं की, मुंबईत तुमचा एक आयकॉनिक प्रकल्प दाखवा. पण उद्धव ठाकरे हे देखील सांगू शकले नाही. त्यामुळे लोकांना हे समजतं की एवढ्या वर्षांत मुंबईतील मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला. तरी ते मुंबईतील मराठी माणसांसाठी फक्त बोलत राहिले, पण एवढ्या मोठ्या महापालिकेवर त्यांची सत्ता असतानाही उद्धव ठाकरेंनी मराठी काहीही दिलं नाही. मराठी माणसांना साधं घरही उद्धव ठाकरे देऊ शकले नाही. दुसरीकडे लोकांनी हे पाहिलं की आम्ही लोकांना बीडीडी चाळीचा पुनर्विकास करून लोकांना घरे दिली. तेव्हा लोकांच्या हे लक्षात आलं की लोकांसाठी कोण महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला मुंबईतील मराठी माणसांनीही मतदान दिलं आणि निवडून आलो.”