CM Devendra Fadnavids On JK Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केल्याची घटना आज (मंगळवार) घडली असून या हल्ल्यात किमान २० पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर १० पर्यटक जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये दोन जण हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच त्यांनी आपण सातत्याने जम्मू काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.”

“जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत,”असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

“स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे,” अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यां नी दिली आहे.

यादरम्यान जगदाळे कुटुंबाच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची प्रतिक्रिया एएनआयशी बोलताना दिली आहे.

सुप्रिया सुळे यांची अब्दुल्ला यांना विनंती

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पुण्यातील जखमींना वैद्यकीय मदत देण्याची विनंती केली आहे. “पहलगाम गोळीबार घटनेत आज जखमी झालेल्या पुण्यातील पुढील नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याकरीता मी ओमर अब्दुल्ला यांना विनंती करत आहे. आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे (गोळीबारात जखमी), कौस्तुभ गणबोटे (गोळीबारात जखमी), आणि संगीता गाबोटे, पुणे. कुटुंबियांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्याची विनंती केली आहे. तुमच्या कार्यक्षम आणि वेगवान व्यवस्थापनासाठी आभार!” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.