Devendra Fadnavis : सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांवर आधारित निकषांनुसार जिल्ह्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणार्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन पार पडलं. यावेळी या निर्देशांकानुसार सरस कामगिरी करणार्या तसेच लक्षवेधक प्रगती नोंदवणार्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानही करण्यात आला.
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाबाबत महत्वाचं भाष्य केलं. ‘महाराष्ट्र २०२९-३० पर्यंत ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होईल. आता ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्यापासून महाराष्ट्राला कोणीही थांबवू शकत नाही’, असं भाष्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“मला आनंद आहे की मी या वर्षी देखील ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’च्या या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तसं तर मी या ठिकाणी परमनंट पाहूणा झालेलो आहे. मला असं वाटतं की ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ हा कार्यक्रम दुसऱ्या कोणत्याही कार्यक्रमापेक्षा वेगळा आहे. कारण विकासाच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये माध्यमं अनेकदा त्याचं मूल्यमापन करत असतात. हे मूल्यमापन करत असताना त्यावर टीकाही करत असतात. मात्र, लोकसत्ताने यामध्ये एक वेगळी भूमिका स्वीकारली आणि समतोल विकास झाला पाहिजे. विकासाचा असमतोल दूर झाला पाहिजे. या अनुषंगाने जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये विकासाची परिस्थिती काय आहे? हे विविध निर्देशांकांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा कशा प्रकारे काम करत आहे, याच्या मोजमापाचं काम या जिल्हा निर्देशांकाच्या माध्यमातून सुरू झालं”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“शासनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेटा उपलब्ध असतो. मात्र, तो सर्व डेटा एकत्रित करणं, त्याचं सत्यापन करणं, त्या डेटाच्या अधारावर रॅकिंग करणं हे खूप मोठं काम आहे. जे काम या ठिकाणी ही तज्ञ समिती करत आहे. त्यामधून जिल्ह्यांमध्ये एक स्पर्धा देखील तयार होत आहे. हे अतिशय चांगलं आहे. आज आपण पाहिलं तर महाराष्ट्र आपल्या देशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे”, असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
“आपल्याला कल्पना आहे की आपला जीएसडीपी (GSDP) ५१ लाख कोटींवर गेला आहे आणि ५४ लाख कोटींवर चाललेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र ही देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकोनॉमी बनेल. आता आपण जवळपास ६६० बिलियनपर्यंत पोहोचलो आहोत. अजून ३४० बिलियनचा टप्पा पार पाडायचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की २०२९ किंवा २०३० पर्यंत आपण ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होऊ. आता ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होण्यापासून महाराष्ट्राला कोणीही थांबवू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
