CM Devendra Fadnavis Marathi Language Mandatory Rickshaw Taxi Drivers: राज्यातील रिक्षा, टॅक्सी चालक तसेच ओला, ऊबर, इ-बाइक टॅक्सीच्या व्यावसायिक अमराठी वाहनचालकांनी प्रवाशांबरोबर मराठीतून संवाद साधावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (वर्किंग नॉलेज) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
दरम्यान या निर्णयाला काही रिक्षा, टॅक्सी चालक संघटनांनी विरोध केला आहे. तर शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध केला असून त्याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आता या विषयावर महत्त्वाचे भाष्य केले आहे.
१ मे पासून मुंबईत सर्व टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून अनेक अमराठी रिक्षा, टॅक्सी चालक याला विरोध करत आहेत. संजय निरुपम हे मुंबईतील दहिसर येथे रिक्षा, टॅक्सी चालकांशी याबाबत संवाद करण्यासाठी गेले असता त्यांच्या वाहनावर मनसेकडून दगडफेक करण्यात आली. भाषेचा वादावर पुन्हा हिंसाचार उसळणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला होता.

या विषयावर बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य देण्याचा आग्रह होत असेल तर त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण याचबरोबर या विषयावरून वाद होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांना आम्ही मराठी शिकवू, अशी आमची भूमिका आहे. बळजबरी करून भाषेच्या नावावर हिंसा करणे आम्हाला मंजूर नाही. यासाठी आम्ही त्या चालकांना मराठी शिकवू आणि कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही.
परिवहन विभागाच्या वतीने ‘महाराष्ट्र दिना’चे औचित्य साधत या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या उपक्रमाला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून, हा निर्णय केवळ प्रशासकीय न राहता अमराठी वाहनचालकांमध्ये मराठी भाषेबद्दल आत्मियता निर्माण करणारा ठरावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
मनसेची भूमिका काय?
मराठी भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संप पुकारण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर मनसेने जोरदार टीका केली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे म्हणाले, “मुंबई बंद पाडू अशा धमक्या महाराष्ट्राला दिल्या जात आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालवली नाही तर तुमची मुंबई बंद होईल, असे बोलले जात आहे. धमकी देणारे अमराठी आहेत, त्यांना मराठी माणसाने धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे. यांना दाखवून द्यावे लागेल की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मुंबई नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि मुंबईला बाहेरचे कुणीही वेठीस धरु शकत नाही.”
