CM Devendra Fadnavis on MNS Raj Thackeray Alliance wit Uddhav Thackeray Shivsena MVA Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठे बदल घडले. यातच शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची जवळीक देखील वाढली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू या निवडणुकांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या राजकीय युतीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे याच्यावर महाविकास आघाडी किंवा उद्धव ठाकरे यांचे काही प्रेम नाही, त्यांचा हे वापर करतात असे मत फडणवीस यांनी मांडले आहे.

एबीपी माझा या वृ्त्तवाहिनीच्या ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीपर्यंत महायुतीबरोबर असलेले राज ठाकरे अचानक महाविकास आघाडीकडे का वळले? याबद्दल देवेंद्र फडणवीस याना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “आमचे संबंध आहेत. मैत्री आहे, ती राहते. ते माझ्यावरही टीका करतात. मी देखील कधी त्यांच्यावर टीका करतो. वैयक्तिक संबंध आणि राजकीय संबंध यातला एक फरक असतो. आता त्यांना ज्या ठिकाणी त्यांच्या पक्षाचा फायदा दिसेल तेथे ते जातील.”

“आता त्यांना कदाचित असे वाटत असेल की, आमच्याकडे जागा नाही. आम्ही तीन पक्ष आहोत. जवळपास महाराष्ट्रातील पॉलिटिकल स्पेस आहे ती आम्ही तिघांनी मिळून व्यापली आहे. त्यामुळे आमच्याकडे पाहून तरी कोणाला खूप काही स्कोप आहे असं दिसत नाही. त्यामुळे त्यांना कदाचित वाटलं असेल की इकडे स्कोप नाही, तिकडे जावं. तर ते तिकडे गेले,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी चिंतन करावं

राज ठाकरेंचा राजकारणात उपयोग केला जात असल्याचेही फडणवीस म्हणाले आहे. “राज ठाकरे यांना कधीतरी याचे चिंतन करावेच लागेल की, महाविकास आघाडी असेल, आता उद्धव ठाकरे असतील या कोणाचेही त्यांच्यावर प्रेम नाहीये. त्या-त्या वेळची पॉलिटिकल आवश्यकता म्हणून, दुसर्‍यावर टीका करायला एक वक्ता मिळतो म्हणून राज ठाकरेंचा ते उपयोग करतात. आता राज ठाकरेंना निर्णय करायचा आहे की त्यांना कोणाबरोबर राहायचं,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.