Devendra Fadnavis : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तसेच त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील भारताने चोख प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला दिलेल्या जोरदार प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भारतीय सैन्यांचं कौतुक करण्यात येत आहे. या अनुषंगानेच आज मुंबईत भाजपाच्यावतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती. या तिरंगा रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना भारतीय जवानांचं कौतुक करत ऑपरेशन सिंदूरबाबत भाष्य केलं. भारत झुकणार नाही हे ऑपरेशन सिंदूरने दाखवलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप तेरा हिंदुस्तान अशी घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आपल्या देशातील सैन्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहोत. भारतीय सैन्यांची ताकद काय आहे हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दाखवून दिलं. हमें कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे ना रुकेंगे ना बिकेंगे ना थकेंगे, अशा प्रकारची भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सर्वांना कळली असेल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये २७ जणांना ज्या पद्धतीने मारलं, धर्म विचारून मारलं, पत्नीसमोर पतीला मारलं, मुलासमोर वडिलांना मारलं. अशा प्रकारचं हत्याकांड भारताच्या नाही तर जगाच्या इतिहासात आपल्याला कधी पाहायाला मिळालं नव्हंत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर देणारं असं सागितलं होतं. त्यानंतर भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि जोरदार प्रत्युत्तर दिलं”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
“आमच्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम केलं त्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घूसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने ज्या ९ ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, त्या ठिकाणी भारतीय सेना कधीच पोहचणार नाही असं पाकिस्तानला वाटायचं. मात्र, तेथेच जाऊन भारतीय सैन्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच पाकिस्तानला हे दाखवून दिलं की दहशतवादी कुठेही लपले तरी आम्ही सोडणार नाही”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हल्ला करण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. भारताने पुन्हा दाखवून दिलं की आपली डिफेन्स सिस्टीम किती मजबूत आहे. भारतीय सैन्यांची ताकद जगाने पाहिली. पाकिस्तानला भारतापुढे गुढगे टेकावे लागले आणि मग शस्त्रसंधी झाली”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.