Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्ताने युगेंद्र पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह आदी नेत्यांनी पोस्ट शेअर करत भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत काही घातपाताची शक्यता वाटते का? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं. दरम्यान, यासह आज दिवसभरातील पाच राजकीय नेत्यांची महत्वाची विधाने काय आहेत? जाणून घेऊयात.
“आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ”, युगेंद्र पवारांची पोस्ट
अजित पवारांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्ताने अनेकजण त्यांच्या आठवणीत हळहळ व्यक्त करत आहेत. युगेंद्र पवारांनी पोस्ट लिहित म्हटलं की, “आजही तुमच्या नसण्याची जाणीव मनाला होत नाही. तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाल की मी कामाचा माणूस आहे, आणि हे काम असंच झालं पाहिजे, असा भास होतो. सतत वाटत राहतं आता तुमची गाठ पडेल आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिलं. मग आपण बोलू, पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जातं. आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत. त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात. आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत”, असं युगेंद्र पवारांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या निधनाला महिना पूर्ण; सुप्रिया सुळेंच्या पोस्टने वेधलं लक्ष
अजित पवारांच्या अपघाती निधनाला एक महिना पूर्ण झाला. त्यानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यासाठी पोस्ट केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आपले अजितदादा सोबत नाहीत, हे पचवणं अजूनही कठिण जात आहे. अजितदादांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही. दादा, तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुमच्यासोबतच्या प्रसन्न क्षणांच्या आठवणी आयुष्यभर कायम सोबत राहतील”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवारांच्या घातपाताची शक्यता वाटते का? मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
अजित पवारांच्या विमान अपघातानंतर आमदार रोहित पवार हे सातत्याने अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत. यावर नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. फडणवीस म्हणाले की, या दुर्घटनेचा तपास डीजीसीएकडून सुरू आहे. आम्ही सीआयडीलाही तपास करण्यास सांगितलं. अजित पवारांच्या कुटुंबाने सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर सीबीआयलाही तपास करण्याची विनंती केली. ज्यांच्या ज्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी डीजीसीएला त्या पाठवून त्याबद्दलचे उत्तर मागावं.” अजित पवारांच्या अपघातामागे घातपाताची शक्यता वाटते का? असा प्रश्न विचारला असता फडणवीस म्हणाले, “जोपर्यंत चौकशी सुरू आहे, तोपर्यंत कोणतेही अंदाज बांधणे योग्य नाही. हे संवेदनशील प्रकरण आहे. जो व्यक्ती मृत्यू पावला त्यांच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचाही आपल्याला विचार करावा लागतो. या विषयावर पतंगबाजी करणे किंवा हवेत गोळ्या मारण्याचा प्रकार मी करणार नाही.”
‘लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण’ : मंत्री गणेश नाईक
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आहे. खुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनीच याची कबुली विधान परिषदेत दिल्याने सरकारची खरी स्थिती समोर आली. राज्य सरकारने गेल्या वर्षभरात अनेक प्रकल्प सुरू केले असून त्यामध्ये या योजनेलाही मान्यता देण्यात आली. मात्र या योजनेमुळे अन्य खात्यांवर ताण निर्माण होण्याची परिस्थिती गणेश नाईक यांनी मांडली. मात्र ही योजना बंद होणार नाही’, अशीही सारवासारव त्यांनी केली.
ठाकरे बंधू एकत्र येऊनही मुंबई का जिंकू शकले नाही? फडणवीसांनी सांगितली कारणं
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊनही का जिंकू शकले नाही? याची कारणे काय आहेत? याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. फडणवीस म्हणाले की, “सर्वात आधी तर जो मुंबईचा मराठी माणूस आहे, तो देखील हे पाहतो की त्यांनी काय केलं. गेल्या ३० वर्षांत मुंबईतील मराठी माणसांना उद्धव ठाकरेंनी काय दिलं? काहीही दिलेलं नाही. मी तर हे म्हणतो की गेल्या १५ वर्षांत उद्धव ठाकरे हे स्वत: मुंबईच्या महापालिकेत लक्ष घालत आहेत, मग मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मी त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. उद्धव ठाकरे हे त्यांच्या भाषणात मुंबईच्या विकासाबाबत बोलले तर मी १०० रुपये देईल. त्यानंतर मी माझ्या बक्षीसाची रक्कम ३ हजारांपर्यंत वाढवली, तरी देखील उद्धव ठाकरे मुंबईच्या विकासाबाबत काहीही बोलले नाहीत. एवढ्या मोठ्या महापालिकेवर त्यांची सत्ता असतानाही उद्धव ठाकरे मराठी माणसांना साधं घरही देऊ शकले नाही”, असं फडणवीस म्हणाले.
