CM Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यावरून सध्या राजकीय वाद निर्माण झाला आहे. वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीत आता प्रतिगामी विचारांच्या लोकांनी घुसखोरी केल्याचं मत मांडत धर्मांध शक्तींना बळ देणाऱ्या लोकांची आम्ही यादी तयार करायला सुरुवात केल्याचं भाष्य शरद पवार यांनी महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्त प्रकाशित स्मरणिकेत केलं. मात्र, शरद पवारांच्या या वक्तव्यावरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे. ‘शरद पवारांचा तो लेख अत्यंत चुकीचा आहे आणि मला अतिशय दु:ख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला’, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच ‘शरद पवारांचा वारकरी विचारांशी संबंध राहिलेला नाही’, अशी टीकाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शरद पवार यांचं महाराष्ट्राच्या विकासात योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही. कारण ज्या प्रकारची चळवळ या महाराष्ट्रात त्यांनी उभी केली किंवा त्यांच्या अनुयायांनी उभी केली ही चळवळ एक प्रकारे निधर्मी अशी चळवळ होती. याबाबत त्यांनी स्वत:ही अनेकदा सांगितलेलं आहे की, ते निधर्मी आहेत. ते धर्म मानत नाहीत किंवा त्यांचा जो पिंड आहे तो निधर्मी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वारकरी संप्रदायाच्या संदर्भात त्यांच्याजवळ योग्य माहिती नसावी”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“मध्यंतरीच्या काळात हा प्रयत्न झाला की वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी शिरकाव करून जो वारकरी विचार आहे, त्या विचाराच्या विरोधात विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा लोकांना वारकरी संप्रदायाने बाहेर काढलं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की हजारो वर्षांची जी समृद्ध परंपरा आहे आणि आपण किमान आठशे ते नऊशे वर्षांचा इतिहास बघितला तर वारकरी विचार हा श्रद्धेचा विचार आहे. वारकरी विचार हा बंधुतेचा विचार आहे. तसेच वारकरी विचार हा भागवत धर्माची पताका घेणाऱ्या व्यक्तीच्या मनाची शुद्धता झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार आहे. तसेच पर्यावरणाशी साधर्म्य साधणारा असा हा विचार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवार यांचा जो काही लेख आहे, तो लेख अत्यंत चुकीचा आहे. मला दु:ख आहे की शरद पवारांनी अशा प्रकारचा लेख लिहिला”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. कुठल्याही साहित्य संमेलनात वेगवेगळी मते येत असतात. कोणी काय लेख लिहावा, शेवटी ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून किंवा देशाचे माजी कृषीमंत्री म्हणून किंवा राजकीय क्षेत्रातील त्यांचं योगदान पाहता त्यांचा लेख घेतला असेल. आता त्या लेखात काय लिहायचं? हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी ते लिहिलं असेल. मात्र, जर शरद पवार यांना यादी हवी असेल तर वारकरी विचारांच्या विरोधात जाऊन जे लोक वारकरी संप्रदायामध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांची यादी मी त्यांना पाठवून देईल”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.