Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : राज्यात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. सध्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. असं असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.
दरम्यान, सर्वात आधी मुख्यमंत्री फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’चे दरवाजे बंद केल्याचं म्हटलं होतं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सूचक भाष्य करत ‘मातोश्रीवरील टीका करणं बंद करा, तर मातोश्रीचे दरवाजे उघडतील’, असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या त्या वक्तव्यानंतर आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत ‘बोलावलं तर मी कुणाकडेही चहा प्यायला जाईन’, असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पुण्यातील एका मुलाखतीत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मातोश्रीचे दरवाजे माझ्यासाठी बंद झाले होते. मी प्रयत्न केला तरी ते दरवाजे उघडले नाहीत. मात्र, परवा कुठल्यातरी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले की मातोश्रीवर टीका करणं सोडलं तर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडतील. आता मी सांगतो की, मी कधीही मातोश्रीवर टीका केली नाही. मी नेहमी माझ्या टीकेचा स्तर ठेवतो. मात्र, मला आता त्यांना एक सांगायचं आहे की माझ्यासाठी महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयाचे दारे आता उघडलेले आहेत. त्यामुळे दुसऱ्या दाराची मला लालसा राहिली नाही. मात्र, कोणी चहा प्यायला बोलावलं तर मी कोणाला नाही म्हणत नाही.”
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री फडणवीस एका मुलाखतीत बोलताना म्हणाले होते की, महापालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे यांनी जर मला चहा प्यायला बोलावलं तर मी जाईन किंवा ते माझ्या घरी येतील. मात्र, उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे दरवाजे माझ्यासाठी २०१९ मध्येच बंद केले आहेत.’ या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “असं अजिबात झालेलं नाही. एवढी माणुसकी विसरणारा मी नाही. मात्र, तुम्ही मातोश्री बदनाम करण्यासाठी निघाला आहात. तुम्ही मातोश्रीवर वाट्टेल ते आरोप करता. ते तोंड तुम्ही बंद करा, मग ‘मातोश्री’चे दरवाजे उघडतील”, असं मोठं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.
“‘मातोश्री’चे दरवाजे उघडतील हे मी एवढ्यासाठीच म्हणत आहे की त्यांनी बकवास करणं बंद करावं. मातोश्रीला बदनाम करण्याचं काम बंद करावं, आमची कौटुंबिक बदनामी देखील बंद करावी, कारण मी कधीही कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही. माझ्याकडे माहिती असून देखील मी कोणाची कौटुंबिक बदनामी केली नाही आणि कधी करणार देखील नाही”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
