राज्याच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता मुख्यमंत्री कोण याची चर्चाही सुरू झाली होती. परंतु एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्याच गळ्यात घालणार असल्याचं जाहीर केलं. तसंच उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णयदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची संसदीय कार्यसमिती घेईल, असं स्पष्ट केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं. स्पप्न पाहण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

अनेकदा मुख्यमंत्रिपदाबाबत आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा करण्यात येते. याबाबत एका मुलाखतीदरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी स्वप्न पाहण्याचा अधिकार प्रत्येकाला असून तो कोणी हिरावून घेऊ शकत नसल्याचं म्हटलं. शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहे. त्यामुळे कोण काय बोलेल याचा विचार केला जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतील बहुमत मिळेल यात कोणतीही शंका नाही. परंतु भाजपाला स्वबळावर बहुमत मिळेल, असा विश्वास यापूर्वी अमित शाह यांनी व्यक्त केला होता. राज्यात शिवसेना भाजपा युती असली तरी मुख्यमंत्री हा भाजपाचाच असेल, असं शाह यांनी स्पष्ट केलं. तसंच उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय देवेंद्र फडणवीस, त्यांची टीम आणि भाजपाची संसदीय कार्यसमिती घेईल असं म्हणत पुढचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील याचे संकेत दिले.