विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आज विधानपरिषदेत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबाबत महत्त्वाचं भाष्य केलं. पुलंना कोट्याधीश म्हणतात त्यानंतर मी ही उपाधी उद्धव ठाकरेंना देईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तेव्हा एकच हशा पिकला. तसंच खास शेर सादर करत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोलाही लगावला.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

आज सभागृहातले एक सदस्य आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र असलेले उद्धव ठाकरे यांचाही निरोप समारंभ आहे. मी असं म्हणेन की राजकारणात वेगवेगळ्या भूमिका असतात, मतभेद असतात. कधी आपण सोबत असतो, कधी संघर्ष करतो. पण या पलिकडचं नातं असतं ते सहप्रवासाचं. उद्धवजींबरोबर आम्ही अनेक वर्षे सहप्रवासी राहिलो आहोत. अनेक चांगल्या गोष्टी समाजासाठी, राज्यासाठी एकत्रित करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली.

उद्धव ठाकरेंचा स्वभाव हा राजकारणी नाही-फडणवीस

उद्धव ठाकरेंचा स्वभाव हा काही राजकारणी नाही. त्यामुळेच अनेकवेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे वेगवेगळी परिस्थिती उद्भवतो. एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा तसा स्वभाव उद्धव ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकार आहेत आणि प्रसिद्ध आणि निष्णात छायाचित्रकार आहेत. महाराष्ट्राच्या विविध छटा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कॅमेरात कैद केल्या आहेत. निसर्ग, किल्ले, वारकरी परंपरा हे सगळं हे त्यांनी कॅमेरात टिपलं. हे फोटो पाहिल्यावर त्यांचं संवेदनशील मन पाहण्यास मिळतं. महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल ही जी उद्धव ठाकरेंची कामं आहेत ती केवळ छायाचित्रण नाही. तर आपल्या संस्कृतीची जपणूक करण्याचं काम उद्धवजींनी केलं आहे. हे करण्यासाठी खूप कष्टही त्यांनी घेतले आहेत. रिस्क घेऊन हेलिकॉप्टरच्या उघड्या दरवाजातून फोटोग्राफी त्यांनी केली. आपला छंद जोपासण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.

What Uddhav Thackeray Said?
उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

राजकारणात काम करताना त्यांनी निर्णय घेतले तेव्हा परिणामांची चिंता केली नाही-फडणवीस

उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले, त्यानंतर जो संघर्ष होता, संकटं आली त्यात आम्ही दीर्घकाळ बरोबर होतो. माझा आणि त्यांचा परिचय २०१० नंतर जास्त आला, २०१४ लाही आला. या सगळ्यातून मैत्रीची भावना त्या काळात तयार झाली. आज ती नाही असं मी म्हणणार नाही. पण आज त्यांच्या काही राजकीय भूमिका आहेत, आमच्या राजकीय भूमिका आहेत. त्या राजकीय भूमिका वेगळ्या झाल्या. पण एक नक्की सांगायचं आहे की राजकारणात काम करत असताना अनेकदा मी हे बघितलं की एखादा निर्णय घेत असताना परिणामांची चिंता त्यांनी केली नाही. विशेषतः एक जो गुण म्हणजे त्यांची शिवसेना असो किंवा एकनाथ शिंदेंची शिवसेना असो बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळा पायंडा पाडला की सामान्यातल्या सामान्य माणसालाही राजकीय चेहरा देणं आणि राजकीय नेतृत्व देणं हे शिकण्यासारखं आहे. उद्धव ठाकरेंनी गुण जोपासला, एकनाथ शिंदेही जोपासत आहेत.

पुलंच्या नंतर कोट्याधीश ही उपाधी कुणाला द्यायची असेल तर मी उद्धव ठाकरेंना देईन

पु.ल. देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात पण त्यांच्यानंतर कुणाला ही उपाधी द्यायची असेल तर मी ती उद्धव ठाकरेंनाच देईन. कोट्या कागदांच्या नाही तर शब्दांच्याच. अनेकदा सहजतेने ते बोलतात. भाषणही सहजपणे ते सातत्याने करताना दिसतात. अनेकवेळा ते भिडताना दिसतात, आक्रमकपणे बोलताना दिसतात. पण त्यांचा मूळ स्वभाव असा नाही. उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभाव शांत, संयमी आहे. वेगवेगळा आवेश राजकारणात आणावा लागतो तो तेदेखील आपण त्यांना आणतो. आता या सभागृहात ते सहा वर्षे होते. त्यांनी ठरवलं तर आणखी सहा वर्षेही ते येतील. पण उद्धवजी या सभागृहात तुमच्या कोट्या आम्हाला कमी ऐकायला मिळाल्या. पुढच्या वेळी आलात तर जास्त कोट्या ऐकायला मिळाव्यात ही अपेक्षा आहे. आम्ही एकत्रित होतो, २०१९ ला काय झालं जे काय झालं त्यासाठी शेर ऐकवतो. साजिश की सौगाद पहनकर बैठ गये, अनचाहे हालात पकडकर बैठ गये, जिनको मेरा हात पकडकर चलना था, हैरत है वो बात पकडकर बैठ गये! असा शेर मुख्यमंत्र्यांनी ऐकवला. मी उद्धव ठाकरेंना खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला आरोग्य मिळो, तुमचं नेतृत्व पक्षांना मिळत राहो अशा शुभेच्छा देतो. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.