CM Devendra Fadnavis on Uddhav Thackeray rally: मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात सप्टेंबरच्या अखेरिस झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवनून देण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हंबरडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. या मागणीबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असताना त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत एक विधान केले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणे सुरू झाले आहे. निधीचा पहिला टप्पा वितरीत करण्यात आला आहे. दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतरही ही मदत सुरू राहणार आहे. तसेच उद्धव ठाकरेंनी काढलेल्या हंबरडा मोर्चाबाबतही फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला.

आम्ही उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरू देणार नाही

या प्रश्नावर उत्तर देत असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोर्चा काढणे विरोधी पक्षाचे कामच आहे. शेतकऱ्यांना मदत मिळणार यावर त्यांचा विश्वास आहे, हे ऐकून बरे वाटले. मदत मिळाली नाही तर ते रस्त्यावर उतरणार असतील तर आम्ही त्यांना रस्त्यावर उतरू देणार नाहीत. आम्ही मदत वेळेवर देऊ.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चात बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार कर्जमाफी करत नाही, तोपर्यंत या सरकारला आम्ही सोडणार नाही. गेल्यावेळी मी मराठवाड्यात आलो तेव्हा पाऊस होता, यावेळी आलो तेव्हा कडक ऊन आहे. इतर वेळेला शिवसेना तुमच्यासोबत आहेच पण ज्यावेळेस तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस शिवसेना तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेत राहू.