BMC vs Dia Mirza Deleted Video Controversy: बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळी आवाहनाच्या व्हिडीओवरून जोरदार राजकारण सुरू आहे. मुंबई महापालिकेने आपल्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आमदार अमित साटम यांच्या टीकेनंतर डिलीट केला. महापौर रितू तावडे यांनीही यापासून हात झटकत एजन्सी आणि प्रशासनावर त्याचे खापर फोडले. तसेच मुंबई उच्च न्यायालयानेही सेलिब्रिटींनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले तर त्यात चूक काय? असे म्हटले. या विषय राजकारणात चर्चेत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केले आहे.
पुण्यात आज हिंजवडी-शिवाजीनगर मार्गिकेचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना दिया मिर्झा व्हिडीओ डिलीट करणे आणि त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने यावर फटकारले वगैरे असे मला वाटत नाही. त्यांनी मत व्यक्त केले असेल. कारण हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातच गेलेले नाही.
‘मुंबई महापालिकेची मर्जी’
मुंबई महापालिकेने सोशल मीडियावरून व्हिडीओ डिलीट केल्याप्रकरणीही उच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, व्हिडीओ डिलीट केला ही, मुंबई मनपाची मर्जी. ज्यांचे सोशल मीडिया हँडल आहे, त्यांना त्यावर काय ठेवायचे आणि काय काढायचे, याचे अधिकार आहेत. त्यांनी त्याप्रमाणे ते केले आहे.
दिया मिर्झावर काय म्हणाले?
“अभिनेत्री दिया मिर्झा या चांगल्या प्रथितयश अभिनेत्री असतील पण त्या काही भारताच्या खूप मोठ्या नेत्या नाहीत. हा आमच्या स्तरावरचा विषय नाही. हा छोट्या स्तरावरचा विषय आहे”, असे सांगून त्यांनी हा प्रश्न त्यांना विचारणे संयुक्तिक नसल्याचे सुचवले.

उच्च न्यायालयाने काय म्हटले?
दिया मिर्झाचा व्हिडीओ डिलीट केल्याप्रकरणी मंगळवारी उच्च न्यायालयाने कुणाचेही नाव न घेता नाराजी व्यक्त केली. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रेटींच्या निवडीला राजकीय नेत्यांकडून जातीय रंग दिला जाणे आणि त्यावरून राजकारण करणे हे दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध असल्याचे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. कोणत्याही व्यक्तीला सण साजरा करण्यापासून वेगळे ठेवता येणार नाही, असे स्पष्ट करून दिया यांची हटवण्यात आलेली चित्रफित पुन्हा प्रसारित करण्याचे आदेशही न्यायालयाने महापालिका प्रशासनाला दिले.
