१५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन होणार आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्यावतीने आज मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीवेळी फडणवीसांनी जोरदार भाषण करत देशभक्तीपर गाणंही गायलं. भारताला आता कुणीही थांबवू शकत नाही. पण हेही खरंय की काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करत आहेत, काही परकीय शक्तीही प्रयत्न करत आहेत की भारताची घौडदौड थांबली पाहिजे. कारण, त्यांना भीती वाटतेय की भारताची घोडदौड अशीच सुरू राहिली, तर जगातील सर्वात महासत्ता असलेला देश भारत होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?

आज खरं म्हणजे मला दोन सागर दिसत आहेत. एक आपला हिंद महासागर समोर दिसतो आहे, दुसरीकडे तिरंग्याचा महासागर पाहण्यास मिळतो. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारांनी फाशीची शिक्षा झेलली, ज्या सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं आणि भारतीयांनी संघर्ष केला त्यानंतर १५ ऑगस्टला जो तिरंगा वरती गेला तो चंद्र आणि सूर्य असेपर्यंत खाली येणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातली चौथी सर्वात मोठी महासत्ता बनला आहे. सातत्याने आपला देश प्रगती करतो आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भारत आघाडीवर आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश अंतरिक्ष यान उतरवू शकला नाही ते काम भारताने करुन दाखवलं. पायरेट कंपनीच्या माध्यमातून अंतराळ यान सोडणारा देश आपला भारत आहे. आयटी, एआय विविध इमर्जिंग टेक्नॉलॉजींमध्ये जगाशी मुकाबला करणारा भारत आपल्याला पाहायला मिळतो आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आपल्या देशाला आता कुणी थांबवू शकत नाही-देवेंद्र फडणवीस

जगात सर्वाधिक युवाशक्ती असलेला देश हा आपला भारत देश झाला आहे. आपल्या भारताला कुणीही थांबवू शकत नाही. एक बाब खरी आहे की आपल्या भारताला काही शक्ती थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, काही परकिय शक्ती हा प्रयत्न करत आहेत की भारताची घोडदौड थांबली पाहिजे. त्यांना भीती वाटते की भारत असाच पुढे जात राहिला तर सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल. त्यामुळे भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये या शक्ती नाक खुपसत असतात. पण मी त्यांनाही सांगू इच्छितो की तिरंग्याला थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही. भारताच्या युवाशक्तीला थांबवण्याची ताकद तुमच्यामध्ये नाही.आता भारत पुढेच जात राहणार. मोदींनी ज्या भारताची संकल्पना केली आहे त्यासाठी केवळ दोन दशकं बाकी आहेत. २०४७ ला जगातला विकसित देश म्हणून आपल्याला जगाच्या नकाशावर पाहण्यास मिळेल. जाती-पाती धर्माच्या भेदांत, इतर वादांमध्ये अडकून आपल्याला चालणार नाही. एक साथ चलू, एकत्रित चालू तिरंगा हातात घेऊन चलू असंच आपल्याला चालावं लागणार आहे. हा विचार घेऊन आपण पुढे गेलो तर कुणीही भारताला थांबवू शकत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.