मुंबई महापालिकांसह २९ महापालिकांची निवडणूक जवळ आली आहे. पुढच्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. या सगळ्या राजकीय रणधुमाळीसाठी सगळे पक्ष सज्ज झाले आहेत. ठाण्यात आपलं ठाणे, आपले देवाभाऊ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

ठाण्यात रिंग मेट्रो सुरु होणार-फडणवीस

ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तेजश्री प्रधानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला, त्यावर फडणवीस म्हणाले, “MMR क्षेत्रात वाहतुकीचा प्रश्न आहे, तो सुटला पाहिजे. जुन्या सरकारच्या काळात ११ किमी मेट्रो होती, आपण आता ४१५ किलोमीटर मेट्रोला मान्यता दिली. त्यापैकी ५० किलो मीटर टप्यात काम करत आहे. रिंग मेट्रो देखील ठाण्यात होत आहे. सबर्बन रेल्वेत अनेक जण लटकून कसरत करत प्रवास करतात, मात्र आता सर्व डबे वातानुकूलित आणि बंद असणार आहेत. आपण ठाण्याला मुंबईकडे, कल्याण-भिवंडीकडे कनेक्टिव्हीटी दिली आहे. त्यासोबतच तीन, चार, पाच मेट्रो ठाण्याशी कनेक्ट केलेल्या आहेत. ठाण्याच्या रिंग मेट्रोचाही प्रस्ताव आपण मान्य केला आहे. ठाणे कदाचित हे पाहिले शहर असेल जिथे पूर्ण रिंग मेट्रो असेल. फक्त मेट्रो करूनच आपण थांबलेलो नाहीत. आपण मेट्रो आणली आहे. ती खूप सुंदर आहे. एसी डबे आहेत. परंतु लोकलही तेवढीच महत्त्वाची आहे, असे सांगून त्यांनी ठाणेकरांसाठी लोकलच्या रेल्वेमध्ये काय सुधारणा करता येईल याबाबत सांगितले.

आमच्या उद्धव ठाकरेंना बुलेट ट्रेनचा राग आला…

ठाणे रिंग मेट्रो प्रथम सुरू होणार की बुलेट ट्रेन ? या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दोन्ही प्रकल्प जवळपास एकाचवेळी सुरू होतील, कारण दोन्ही प्रकल्पांमध्ये स्पर्धा सुरू आहे. बुलेट ट्रेन आधी येऊन गेली असती. पण मध्यंतरीच्या काळात आमच्या उद्धवजींना बुलेट ट्रेनचा राग आला, त्यांनी त्याला स्थगिती देऊन टाकली. यामुळे सगळी कामे थांबली, गुजरात साईडला काम चाललं होतं, महाराष्ट्राच्या बाजूला बंद होतं. शेवटी ईश्वराच्या मनात असतं ते होतं. त्यामुळे पुन्हा आमचं सरकार आलं आणि अत्यंत वेगाने ते काम सुरु आहे. २०२८ मध्ये कदाचित आपल्याला बुलेट ट्रेन पाहण्यास मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे.