CM Devendra Fadnavis: मालेगाव महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्यावरून भडकलेला वाद आता राज्यभरात पोहोचला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकारानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचे कार्य एकसमान असल्याचे म्हटले होते. त्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले, “टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्याचे काम हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. हे अतिशय निंदनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारून मोगलांच्या जोखडातून सामान्यांना मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने त्यांनी सामान्य रयतेचे राज्य निर्माण केले. त्याचवेळी हजारो-लाखो हिंदूंची हत्या करणाऱ्या टिपू सुलतानशी महाराजांची तुलना करून दोघांनाही सारखाच सन्मान द्या म्हणणे, यापेक्षा जास्त लांगूलचालन या जन्मात मी बघितले नाही.”
टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागायला हवी. काँग्रेस पक्षात थोडी जरी नैतिकता उरली असेल तर त्यांनी या विधानाची दखल घेत भूमिका स्पष्ट करावी. तसेच त्यांच्या मित्रपक्षांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले. याचेदेखील संशोधन केले पाहिजे. हा नवा इतिहास ते लिहायचा प्रयत्न करत आहेत. हा इतिहास महाराष्ट्र आणि भारत खपवून घेणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
टिपू सुलतानचा वाद कसा उद्भवला?
मालेगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या खुर्चीचा ताबा घेतला. मात्र उपमहापौर शान-ए-हिंद (समाजवादी पार्टी) यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याने हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला. प्रशासकीय नियमांचे उल्लंघन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या तीव्र विरोधामुळे महापालिकेच्या नगरसेवक विभागाने हस्तक्षेप करत हे छायाचित्र दालनातून काढून टाकले.

दरम्यान छायाचित्र दालनातून काढले गेले असले तरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यामांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आणि आता त्यांच्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीका करत आहेत.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या शौर्याप्रमाणेच, टिपू सुलतानही त्याच मांदियाळीतील आहेत. टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात लढा पुकारला होता. टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे होते. ते भारताचे भूमिपूत्र होते. त्यांनी कधीही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. ते एक शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

