राज्यमाता गोमाता संवाद यात्रेचा समारोप नागपूरमध्ये करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. मला अतिशय आनंद होतो आहे की आपल्या राज्याच्या गो सेवा आयोगाच्या माध्यमातून जवळपास पंधरा दिवस आणि तीस जिल्हे झाल्यानंतर राज्यमाता गोमाता संवाद यात्रा पार पडली आणि नागपूरमध्ये समारोप करतो आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गायीला आपण कायमच आईचा दर्जा दिला आहे-फडणवीस
आपल्या घरातली गाय म्हणजे त्या त्या कुटुंबातला सदस्य. गायीला कुणीही जनावर मानलंच नाही. गायीला आईचाच दर्जा आमच्याकडे होता. कारण ज्या प्रकारे आई म्हातारी झाली तरी ती कुचकामी होत नाही. तसंच आपली गायही म्हातारी झाली तरीही ती कुचकामी होत नाही ती फक्त आपल्याला देत असते. आज खऱ्या अर्थाने गोमातेचं संवर्धन ही काळाची गरज आहे. विषमुक्त अन्न द्यायचं असेल तर तेही गोमातेशिवाय शक्य नाही. ज्या शेतकऱ्यांकडे गोवंश राहिला आहे, गोमाता आहे त्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार आहे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भातल्या अहवालाचा उल्लेख
साधारण २००७ ते २००८ मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यासंदर्भात एक अनुसंधान झालं आणि त्यांचा अहवाल आला त्या अहवालात ही बाब समोर आली की ज्यांच्याकडे गोवंश किंवा गाय होती त्यांनी विपरीत परिस्थितीतही आत्महत्येचा विचार केला नाही. पण ज्यांच्याकडे गोवंश नव्हता पूर्णपणे संपला होता अशा शेतकऱ्यांचा आत्महत्या करण्याकडे जास्त कल दिसला. एक प्रकारे सगळ्या पद्धतीने आपल्याला आधार देणारी आपली गाय आहे. भारतातील देशी गायींचा इतिहास मोठा आहे. पाकिस्तानातल्या सिंध भागातील लाल सिंधी असेल, गुजरात, राजस्थान भागातील देवणी गाय असेल या सगळ्या गायी ज्यांचं खऱ्या अर्थाने योग्य संवर्धन केलं असतं तर शेतीची अवस्था वेगळी असती. आपलीच गीर गाय ब्राझिलला नेऊन आणि प्रयोग करुन त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग केले आणि दुधामध्ये मोठी भरारी ब्राझिलने घेतली. देशातले १० प्रमुख देश असे आहेत ज्यांनी आपल्या गायींना तिथे नेऊन संकरित गायी तयार केल्या. त्यामुळे त्यांच्यातल्या ८० टक्के गायींचे जीन्स हे आपल्या देशातले आहेत. ब्राझिलमध्ये १८७० ते १९६२ या कालावधीत भारतीय गायी नेल्या आणि गोवंशाची रचना केली. आज पुन्हा एकदा समाजात जेव्हा एक जागृती तयार होते आहे आणि आपल्याला हे महत्त्व समजतं आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणात चांगलं दूध देणाऱ्या देशी गायी तयार करता येतात. मोठी अर्थव्यवस्था तयार करता येते आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसांसाठी व्हॅल्यू चेन तयार करता येते. भारतात अनेक संस्थांनी या साठी उत्तम काम केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
गोपालन करण्यात आजही अडचणी येत आहेत पण..
गायीच्या शेणापासून तयार झालेला पेंट हा ऑर्गेनिक पेंट म्हणून वापरला जातो आहे आज गोपालन करण्यासाकाही अडचणी होत आहेत. पण गो आधारीत अर्थव्यवस्था आपण तयार करु शकलो तर मोठं परिवर्तन आणता येईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. प्रत्येक गोशाळा ही गो शक्तीचं केंद्र झालं पाहिजे. तिथे संवर्धनच नाही तर त्यांचं अनुसंधान झालं पाहिजे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपण गो आधारित अर्थव्यवस्था तयार केला तर आपण या सगळ्या गोष्टी करु शकतो. गोसेवकांच्या आणि गोपालकांच्या पाठिशी सरकार उभं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
