राज्याच्या राजकारणात विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र, अद्याप महायुतीचं जागावाटप जाहीर झालेलं नाही. महायुतीमधील कोणता पक्ष किती जागा लढवणार? हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. पण या घडामोडी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अर्थ खात्यांवरून नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

यातच आज राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य करत राष्ट्रवादीला अद्याप अर्थखातं मिळालं नसल्याचं सांगत भाजपा आमचा सन्मान राखेल असं म्हटलं. दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं देण्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं.

‘राष्ट्रवादीने अद्याप माझ्याकडे अर्थखातं मागितलं नाही, मागितल्यानंतर मी त्यावर बोलेन’, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महायुतीमधील विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबतही मोठं भाष्य केलं आहे.

विधानपरिषदेच्या जागावाटपाबाबत फडणवीस काय म्हणाले?

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, “विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल आमचं जवळपास एकमत झालेलं आहे. केवळ शिवसेनेबरोबर नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर यापैकी आम्हाला एक जागा मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. तसेच राष्ट्रवादीने आम्हाला पुण्याची जागा मागितली आहे. त्यामुळे या दोन गोष्टींवरच आमचं आडलं आहे. मात्र, यावर आम्ही लवकरच मार्ग काढू. आता कठीण पेपर संपला असून फक्त सोपा पेपर बाकी आहे. आता फक्त टिकमार्क करायचं बाकी आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीला अर्थखातं देण्याबाबत फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी राष्ट्रवादीला पुन्हा अर्थखातं देण्याबाबत प्रश्न विचारला. यावरून सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याच्या चर्चा असल्याचं पत्रकारांनी म्हटलं. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, “मला तरी अद्याप अर्थखातं मागितलं नाही. मात्र, मला मागितलं की मी सांगेन. माझ्यापर्यंत अशी कोणतीही नाराजी आलेली नाही. जर माझ्यापर्यंत अशी कोणती नाराजी आली तर मी त्याबाबत बोलेन”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादीला अर्थखातं मिळण्याबाबत मुश्रीफ काय म्हणाले होते?

“अर्थखातं हे आमच्याकडे होतं. सुनेत्रा पवार या नवीन उपमुख्यमंत्री झाल्या आणि त्यानंतर लगेच अर्थसंकल्प मांडण्यासाठी आला होता. त्यामुळे अर्थखातं नंतर आम्हाला दिलं जाईल असं सांगितलं होतं. मात्र, अद्याप अर्थखातं मिळालं नाही, याबाबत त्यांनी भावना जरी व्यक्त केल्या असल्या तरी आज सुनेत्रा पवार दिल्लीत गेलेल्या आहेत. याबाबत नक्कीच निर्णय होईल आणि भारतीय जनता पक्ष नक्कीच आमचा सन्मान राखेल”, असं हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

राष्ट्रवादीच्या बैठकीत काय काय घडलं?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची बैठक पार पडली. पण या बैठकीला प्रफुल्ल पटेल उपस्थित नव्हते. बैठकीत सुनील तटकरे मुद्दे मांडत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्पष्टता येण्यासाठी आपण बोलणारच असल्याचं सुनील तटकरेंनी छगन भुजबळांना सांगितलं. ज्यानंतर या दोन नेत्यांमध्ये वाद झाला. तर सुनील तटकरेंच्या भाषणापूर्वीच पार्थ पवार बैठकीतून निघून गेले. त्यामुळे पक्षातीत अंतर्गत मतभेद आता समोर आले आहेत.

सुनेत्रा पवार यांनी काय सांगितलं?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंध असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. तसंच पक्षात फूट पडणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी नाराजी व्यक्त करत, २२ आमदार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांमधून पक्षाची बदनामी केली जात असल्याचं म्हटलं. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदांबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावरही त्यांनी सारवासारव करत, पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल, असं स्पष्ट केलं.

भुजबळ तटकरे खडाजंगी कशावरुन झाली?

राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी आपल्यावर आणि प्रफुल पटेल या ज्येष्ठ नेत्यांवर आणि पक्षावर टीका होत असताना पक्षातील इतर कोणताही नेता किंवा नेतृत्व आमचे समर्थन करत नसल्याची खंत यावेळी व्यक्त केली गेली. अजितदादांच्या निधनानंतर आम्ही पक्ष वाढवत असताना आम्ही दोघेच टिकेचे धनी का? असा सवालही सुनील तटकरेंनी केला. सुनील तटकरे यांच्या या मुद्यावर छगन भुजबळांनी आक्षेप घेतला. जे झाले ते झाले ते सोडून द्या आता पुढे जाऊया असा सल्ला भुजबळ यांनी तटकरे यांना दिला. त्यावरुन दोघात खडाजंगी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.