Nashik IT Company Sexual Harassment and Religious Conversion Case latest news: नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक शोषण तसेच धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नाशिक पोलिसांच्या तपासावर भाष्य केले आहे.

बीड येथे माध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “हे अतिशय गंभीर प्रकरण असून पोलिसांनी ते उघडकीस आणले. अशा प्रकारच्या आयटी कंपनीत दबाव आणून धर्मांतर आणि लैंगिक शोषण केले. ते अतिशय धक्कादायक आहे. मी पोलिसांचे कौतुक करेन की त्यांनी वेगाने कारवाई करत याचा भांडाफोड त्यांनी केला.”

प्रकरण काय आहे?

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर घडलेल्या अत्याचाराची माहिती सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. २०२२ ते २०२६ या कालावधीत हे गुन्हे घडले. यातील एक गुन्हा लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आहे, तर एक गुन्हा धर्म परिवर्तनाच्या प्रयत्नाचा आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती, गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेऊन सखोल तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सहायक आयुक्त (गुन्हे) यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक अर्थात ‘एसआयटी’ची स्थापना केली आहे. तक्रारदारांमध्ये आठ महिला तर एका युवकाचा समावेश आहे. या युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे समोर आले.

लग्नाचे वचन आणि लैंगिक अत्याचार

जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील तीन सहकाऱ्यांनी पीडितेला विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून धार्मिक भावना दुखावल्या. एका संशयिताने लग्नाचे वचन देऊन पीडितेसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच अन्य एकाने कार्यालयात, जिन्यात पकडून पीडितेशी लैंगिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे.

विनयभंग, अश्लील शेरेबाजी आणि चुकीचा स्पर्श

२०२२ ते २०२६ या काळात आरोपींनी महिला सहकाऱ्यांच्या वैयक्तिक वैवाहिक आयुष्याबाबत लज्जास्पद टिप्पणी करत चुकीचा स्पर्श केला आणि पीडितेकडे रोखून पाहिल्याचा आरोप करण्यात आला. तसेच जवळीक साधण्याच्या उद्देशाने खासगी आयुष्याविषयी लज्जास्पद गोष्टी विचारल्या. तसेच गैरवर्तन केले. अशा प्रकारचे तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत.

Nashik MNC Sexual Harassment SIT Case
नाशिक हादरले! भोंदूबाबा अशोक खरात आणि रवींद्र एरंडे प्रकरणानंतर आता नामवंत बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण

इतर धर्माची प्रार्थना, मांसाहार करण्यास भाग पाडले

२०२२ ते २३ मार्च २०२६ दरम्यान बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तीन संशयितांनी विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह बोलून पुरुष तक्रारदाराला त्यांच्या धर्माची प्रार्थना करायला भाग पाडले. विशिष्ट धर्माचा अपमान केला. तक्रारदाराला बळजबरीने मांसाहार सेवन करायला लावून त्याचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. विशिष्ट धर्मातील महिलांबाबत अश्लील शब्द आणि शेरेबाजी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे.