Devendr Fadnavis Turtle Statement : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कासवाविषयीचं एक विधान आज बरंच चर्चेत आहे. माझ्यासाठी कासव प्रेरणा आहे, असं ते म्हणाले. नागपुरात उद्योगपतींशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. तसंच, मित्र माझ्याशी बोलताना दडपण घेतात, मात्र मी मुख्यमंत्री असलो तरीही तुमचा मित्रच आहे ही जाणीव त्यांना करून देतो, असंही ते म्हणाले.

कामं पिढ्यान् पिढ्या लक्षात राहतं

देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांमुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली. या टीकांकडे कसं पाहिलं जातं? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोक काही काळापुरती हेडलाईन देतात. काही लोक त्यांना लक्षात ठेवतात, पण लोक नंतर विसरून जातात. पण त्यांच्याकडून जे काम झालंय ते पिढ्यान् पिढ्या लक्षात राहतं. मला वाटतंय की मी बरोबर काम करतोय तर मी अत्यंत धीम्या गतीने का होईना काम करत राहतो. यासाठी कासव माझी प्रेरणा आहे.”

याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणाले, “कासव चालत राहतो, कोणी दगड मारला की कवचात जातो. वरून दगड लागत राहतो, पण होत काही नाही. पण दगड मारणं थांबलं की पुन्हा चालत राहायचं. अर्थात चाल कासवाची नाहीय, चालीत वेग आहे, पण प्रेरणा कासवच आहे. ” अशा वेळेस त्यांनी राज्यातील विविध कामांचाही उल्लेख केला. सुरुवातीला विरोध झालेल्या अनेक प्रकल्पांना आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं.

एखादा व्यक्ती मोठ्या पदावर जातो तेव्हा त्याला टीका ऐकायला आवडत नाही, असं लोकांना वाटतं. पण गेल्या काही वर्षातं मी राजकारणात आहे त्यामुळे मला लगेच कळतं की समोरच्याला नेमकं काय म्हणायचं आहे, असंही ते म्हणाले.