महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन ओळींची एक सूचक पोस्ट केली आहे. मात्र, त्यांनी संबंधित पोस्ट कोणत्या घटनेवरील प्रतिक्रिया म्हणून केली आहे, याबाबत खुलासा आलेला नाही. राज्यातील वा देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियाचा आधार घेतात. सरकार वा संबंधित यंत्रणेवर टीका करण्याकरता ते सूचक पण लांबलचक पोस्ट लिहितात. त्यांच्या पोस्टना तितकाच तुफान प्रतिसादही मिळतो.
राज ठाकरेंची पोस्ट नेमकी काय?
दरम्यान, आज त्यांनी केवळ २ ओळींचीची पोस्ट लिहिली असून त्यांचा इशारा नेमका कोणावर आहे, हे समोर आलेलं नाही. “कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तूर्तास एवढेच!”, असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मात्र, त्यांचा रोख कोणावर आहे हे समजू शकलेलं नाही. दरम्यान ही टीका अमित शाह यांच्यावर केली आहे असा अर्थ काढत पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं.
राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देत काय म्हणाले फडणवीस?
“अमितभाई शाह यांचं पूर्ण भाषण ऐकलं असतं तर कदाचित अशा प्रकारच्या प्रतिक्रियाच आल्या नसत्या. पण सिलेक्टिव्ह दाखवायचं, सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि सिलेक्टिव्ह गोष्टींवरच प्रतिक्रिया घ्यायच्या हे अतिशय अयोग्य आहे. महाराष्ट्रात मराठीच कशी योग्य आहे हे अमित शाह यांनी सांगितलं. मराठीचा गौरव काय ते अमित शाह यांनी सांगितलं. मातृभाषेत शिक्षण दिलं पाहिजे हा मोदींचा आग्रह आहे हेदेखील त्यांनी सांगितलं. तसंच अमित शाह म्हणाले महाराष्ट्र हे असं राज्य आहे जिथे लोक वेगळ्या भाषा शिकतात. बहुभाषिक असण्याचा अर्थ तुमची मातृभाषा वेगळी असा होत नाही. मी बहुभाषिक आहे. माझी मातृभाषा मराठी आहे. मला हिंदी बोलता येते, इंग्रजी बोलता येते. मी बहुभाषिक होतो, मी काय मराठी राहणार नाही का? मी मराठीच आहे, मराठीच राहणार आहे. माझं मराठीपण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही.
सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि…
मला वाटतं सिलेक्टिव्ह ऐकायचं आणि सिलेक्टिव्ह बोलायचं आणि त्याच्यावर टीका करायची. त्या भाषणात मराठीच्या गौरवाबाबत अमितभाई शाह जे बोलले ते जर ऐकलं गेलं असतं तर बरं झालं असतं. पण ते ऐकून न ऐकल्यासारखं करायचं, कारण ऐकलं तर तुमची थोबाडं काळी होतात. तुम्हाला टीका करता येत नाही, त्यांच्याबाबत बोलता येत नाही. हे जाणीवपूर्वक करणं चाललेलं आहे. महाराष्ट्र मराठीच आहे, मराठीच राहणार आहे.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
