भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा बुधवारी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगला या ठिकाणी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा, शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) नेतेही उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या अनुषंगाने जागावाटपाची चर्चा या दोघांमध्ये झाल्याचं समजतं आहे. महायुतीमध्ये लोकसभेच्या ४८ जागांचं वाटप कसं होणार हा प्रश्नही चर्चिला गेला. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते आहे. मात्र राष्ट्रवादीच्या एकाही नेत्याने या बैठकीला उपस्थिती दर्शवली नव्हती. त्यामुळे बैठकीत काय घडलं हे सांगता येणं काहीसं कठीण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे आणि जे. पी. नड्डा यांच्यात एक तास चर्चा

वर्षा निवासस्थानी जेपी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली. तासभर झालेल्या या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. भाजप प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकरही यावेळी उपस्थित होते. महायुती म्हणून कशा प्रकारे आगामी निवडणुकांत लढले पाहिजे तसेच जनतेच्या आणि विकासकामांबाबत चर्चा झाली झाली. त्याआधी महायुतीच्या नेत्यांमध्ये स्नेहभोजन झालं. पण या बैठकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. त्यामुळे महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भातील तिढा सुटणार का? याची राजकीय चर्चा सुरु आहे.

३२-१२-४ चा फॉर्म्युला?

काही माध्यमांनी सूत्रांच्या माहितीच्या आधारे ३२-१२-४ हा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं आहे. मात्र याबाबत महायुतीकडून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. ३२-१२-४ चा फॉर्म्युला म्हणजे भाजपा लोकसभेच्या ३२ जागा लढवणार, शिवसेना(एकनाथ शिंदे) १२ जागा लढवणार तर राष्ट्रवादी (अजित पवार) ४ जागा लढवणार. मात्र या फॉर्म्युलाबाबत छगन भुजबळ यांना विशेष अधिवेशनाच्या दिवशी विचारलं गेलं असता शिवसेनेला जितक्या जागा दिल्या जातील तितक्याच आम्हालाही दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी असेल असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- “२५ वर्षांत मुंबईसाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? मुलगा १८ वर्षांचा झाला की त्याला मिसरुड….”, देवेंद्र फडणवीसांची टीका

शिवसेनेच्या १८ खासादारांपैकी १३ खासदार शिंदेंसोबत आहेत. पण यातील काही मतदारसंघामध्ये भाजपाने चाचपणी सुरु केली आहे. महायुतीची जागावाटपाची चर्चा सध्या प्राथमिक स्वरुपात सुरु झाल्याचंही वृत्त आहे. यामध्ये भाजपनं ३२ जागांवर दावा केला आहे. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागू शकतं अशी चिन्हं आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जे. पी. नड्डा आणि एकनाथ शिंदे यांच्यातली भेट महत्त्वाची मानली जाते आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde and bjp leader j p nadda meeting on varsha along with devendra fadnavis scj
First published on: 22-02-2024 at 08:54 IST