scorecardresearch

Good News : महापालिका, नगरपालिकांमध्ये ४० हजार पदं भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्यातल्या महापालिका, नगरपरिषदांमध्ये ४० हजार पदांची भरती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं.

Good News : महापालिका, नगरपालिकांमध्ये ४० हजार पदं भरणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारने राज्यातील सर्व नगपरिषदा, महानगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ४० हजार पदांच्या भरतीचे आदेश दिले आहेत. राज्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका तसंच अ वर्ग नगपालिका मुख्याधिकाऱ्यांची परिषद मुंबईत पार पडली. पालकमंत्री दीपक केसरकर तसंच मंत्री मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव सोनिया सेठी, महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल या सगळ्यांची बैठकीला उपस्थिती होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काय आहे मुख्यमंत्री कार्यालयाचं ट्विट?

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, पंचायतींमध्ये ५५ हजारांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. त्यातील राज्यस्तरीय संवर्ग आणि संबंधित नागरी संस्थांमधील ४० हजार विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. राज्य संवर्गाचे एकूण १९८३ पदं संचालनालयामार्फत आणि नगर पंचयात स्तरावरील संवर्गता गट क आणि गट ड मध्ये ३७२० पदांची भरती करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती तर्फे करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेत ८४९० पदांची भरती

मुंबई महापालिकेत ८ हजार ४९० पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली असून मे अखेर संपूर्ण भरती पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. महानगरपालिकांमधील रिक्त पदांचा आढावा घेऊन सर्व सेवाविषय बाबी पूर्ण करून प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-01-2023 at 22:38 IST

संबंधित बातम्या