राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. यानंतर वाद निर्माण झाला. राज्यात भाजपाने आक्रमक होत ठिकठिकाणी भुजबळांचा निषेध केलाय. तसेच माफीची मागणी केली. अशातच आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. “”कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल. त्यांना वाटेल ते आम्ही करणार नाही. जे लोकांना वाटतं तेच आम्ही करणार आहोत.”

“या स्वामीनारायण मंदिराच्या भूमिपूजनालाही मी आलो होतो. मी मुख्यमंत्री असताना मला संधी मिळाली हा योगायोग आहे. त्यासाठी मी खूप समाधानी आहे. तीन वर्षात हे भव्यदिव्य मंदीर निर्माण झालं. हे एक मोठं काम स्वानारायण मंदिराबाबत झालं आहे,” असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.

भुजबळ नेमकं काय म्हणाले?

आपल्या भाषणामध्ये छगन भुजबळ यांनी शाळांमध्ये फुले, आंबेडकर, शाहू यांचे फोटो लावले पाहिजेत कारण त्यांनी शिक्षणाचा अधिकार दिला असं विधान केलं. मात्र यावेळी त्यांनी हिंदू देवींच्या फोटोंचा उल्लेख केला. “शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा लावला पाहिजे. शाहू महाराजांचा फोटो लावा पाहिजे. बाबासाहेबांचा लावा फोटो. कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा. सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. जिला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची?” असं विधान छगन भुजबळ यांनी केलं.

“हे तुमचे देव असले पाहिजे…”

“मला काही कळत नाही. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं ते हे सगळे इथे आहेत,” असं भुजबळ यांनी मंचावरील महापुरुषांच्या फोटोंकडे पाहत म्हटलं. पुढे बोलताना भुजबळ यांनी, “यांच्यामुळेच तुम्हाला शिक्षण मिळालं. अधिकार मिळाले आणि सगळं मिळेल. यांची पूजा करा हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव समजून यांची पूजा झाली पाहिजे. यांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव-बीव आहेत ते नंतर बघूयात,” असंही म्हटलं.

“…म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे पीएफआयवर बोलताना म्हणाले, “पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा घोषणा देणाऱ्यांना या देशात राहण्याचाच अधिकार नाही. त्यामुळे पीएफआयवर जी बंदी घातली ती योग्य आहे.”

“या राज्यात, देशात कुठल्याही परिस्थितीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं खपवून घेतलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,” अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.

हेही वाचा : “फक्त तीन टक्के लोकांना शिकवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी?”, भुजबळांच्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, “हे सरकार…”

“केंद्राचा आणि राज्याचा गृहविभाग दोघांचंही यावर बारीक लक्ष आहे. या देशात राष्ट्रद्रोही, देशद्रोही विचार कुणालाही पसरवता येणार नाही आणि पसरवू दिले जाणार नाहीत,” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde comment on chhagan bhujbal statement on saraswati photo in school pbs
First published on: 28-09-2022 at 14:50 IST