सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिंदे यांच्याव्यतिरिक्त मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रसिंह राजे आदी नेते उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले अनुपस्थित राहिले. राज्यपाल कोश्यारी यांच्या शिवरायांवरील वक्तव्यानंतर उदयनराजे नाराज असल्याचे म्हटले आहे. दरम्यान उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शिवसेनेतील बंडावर बोलताना एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल! म्हणाले “ज्यांच्याकडे काही काम नाही ते…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे. याच मागणीला घेऊन उदयनराजे लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत. याच कारणामुळे ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसल्याचे म्हटले जात आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आले. मात्र त्यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देण्याचे टाळले. “उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवप्रतापदिनाच्या निमित्ताने सर्वांनाच आनंद आहे. त्यांच्यासह सगळेच आनंदी आहेत,” अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

हेही वाचा >>> गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी लवकरच ‘दुर्ग प्राधिकरणा’ची स्थापना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!

“प्रतापगडाच्या संवर्धनासाठी तातडीने २५ कोटी रुपये देण्याचे निर्देश मी दिले आहेत. या किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. मला शिवाजी महाराजांना वंदन करण्याचे भाग्य लाभाले. गडकोट किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे आहेत. या किल्ल्यांमधून प्रेरणा घेता येते. गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्यासाठी गड-कोट प्राधिकरण स्थापन करण्यात येईल,” अशी माहितीही एकनाथ शिंदे यांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde comment on udayanraje bhosale absent in shivpratap din program prd
First published on: 30-11-2022 at 14:46 IST