ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं प्रदीर्घ आजाराने पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झालं. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली. “भेदक नजर, भारदस्त आवाज आणि संयत अभिनयाने वैविध्यपूर्ण अशा भूमिकांचा नावाप्रमाणेच ‘विक्रम’ करणाऱ्या प्रतिभावंत महान अभिनेत्याचे निधन कला क्षेत्राची हानी आहे,” अशी भावना व्यक्त करत मुख्यमंत्री शिंदेंनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली अर्पण केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. हा वारसा त्यांनी दमदारपणे पुढे नेला. मराठीसोबतच त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत, रंगभूमी, दूरचित्रवाणी आपल्या दमदार कामगिरीने आदराचं आणि वेगळं स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांचीही कलाकाराच्या कलासाधनेत जबाबदारी असते असं खडसावून सांगणारा सडेतोड भूमिका घेण्याचे धारिष्ट्य दाखवणारा कलाकार म्हणून ते परिचित होते. त्यांनी कसदार अभिनयाने नायक, सहअभिनेता ते चरित्र नायक अशा सर्वच प्रकारच्या भूमिकांना न्याय दिला.”

“विक्रम गोखलेंचं निधन कला क्षेत्राची हानी”

“अभिनयात ‘निशब्द-निश्चल’अशी जागा घेण्याचे कसब असो वा, पल्लेदार संवादफेक त्यातून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. एका प्रतिभावंत मराठी सुपुत्राने भारतीय रंगभूमी, चित्रपटसृष्टीसाठी दिलेले योगदान आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या क्षेत्रातील नव्या पिढीला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनामुळे एका कलासक्त मार्गदर्शकाची निश्चितच उणीव भासत राहील, ही कला क्षेत्राची हानीच आहे,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली.

व्हिडीओ पाहा :

विक्रम गोखले यांनी अभिनयाचे मापदंड निर्माण केले – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही विक्रम गोखले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “रंगभूमी तसेच चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी अभिनय एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला होता. एकापेक्षा एक सरस भूमिकांमधून त्यांनी उत्कृष्ट अभिनयाचे मापदंड प्रस्थापित केले. हिंदी व मराठी चित्रपट तसेच रंगभूमीवर प्रदीर्घ काळ काम करताना त्यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या.”

हेही वाचा : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

“गोखलेंनी सामाजिक प्रश्नांवरही निर्भीडपणे मते मांडली”

“काही चित्रपट व नाटके केवळ त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयामुळे लोकांच्या लक्षात आहेत. सामाजिक प्रश्नांवरदेखील गोखले यांनी आपली मते निर्भीडपणे मांडली. अलीकडेच १५ ऑगस्टला त्यांची प्रत्यक्ष भेट झाली, परंतु दुर्दैवाने ती भेट शेवटची ठरली. या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” असं राज्यपाल कोश्यारींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde governor bhagat singh koshyari paid tribute vikram gokhale pbs
First published on: 26-11-2022 at 17:11 IST