गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा नेते सुधांशू त्रिवेदी आणि मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यांवरून जोरदार राजकीय कलगीतुरा पाहायला मिळत आहे. शिवाजी महाराज हे आता जुन्या काळातील आदर्श झाले, असं म्हणणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्रातून परत बोलावण्यात यावं, अशी मागणी ठाकरे गटासह महाविकास आघाडीकडून करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ राज ठाकरेंनी कोकण दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं असून शिवाजी महाराजांचं नाव कधीच घेतलं नाही, असा दावा केला. त्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिल्यानंतर आता शिंदे गटाकडून शरद पवार आणि ठाकरे गटाला खोचक टोला लागवण्यात आला आहे.

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राजकीय टोलेबाजी करणारी एक कविताच त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणेच ठाकरे गट, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनाही टोला लगावला आहे.

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र
Sharmila Pawar
अजित पवारांच्या सख्ख्या वहिनी आता सुप्रिया सुळेंच्या प्रचारात; म्हणाल्या, “आपल्या माहेरवाशिणीला…”

“शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे…”

“शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही? भ्रष्टवादींच्या गजभियेंना महाराज बनून ऐऱ्या-गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी
एकदाही एखादा गड चढला नाही यात शिवरायांचा अपमान नाही?” असा सवाल या कवितेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला आहे.

“शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात कार्यकर्ते शिवरायांना शरदमुखचंद्र चिकटवतात. भ्रष्टवादीच्या ऑफिशियल अकाउंट वरून ट्वीट करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असंही या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

संजय राऊतांना टोला

दरम्यान, या ट्वीट्समधून संजय राऊतांनाही म्हस्केंनी टोला लगावला आहे. “उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत..दम तर तसा काहीच नाही भाऊत. पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना..सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना..यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले, कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले..यात शिवरायांचा अपमान नाही?”, असाही सवाल म्हस्केंनी उपस्थित केला आहे.

“अंधारे बाई तर कहरच करतात”

शरद पवार आणि संजय राऊत यांच्याप्रमाणेच नरेश म्हस्केंनी सुषमा अंधारेंचाही या कवितेमध्ये उल्लेख केला आहे. “अंधारे बाई तर कहरच करतात..निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलना जिजाऊशी करतात..यात शिवरायांचा अपमान नाही?” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि दाव्यांमुळे सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.