राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून सुरू झालेला शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील कलगीतुरा अजूनही संपण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूंनी सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने केलेल्या गुवाहाटी दौऱ्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या सभेमध्ये शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर आणि कामाख्या देवीच्या मंदिरातील दर्शनावर खोचक टीका केल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मी जे करतो, ते खुलेआम करतो”

हेलिकॉप्टरमधून अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केल्याची टीका उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात बोलताना केली होती. त्यावरून टोला लगावताना एकनाथ शिंदेंनी आपण सगळं खुलेआम करतो, असं म्हटलं आहे. “मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून-छपून करत नाही. काही लोक लपून-छपून करतात. पण अशी कामं उजेडात येतात. ती लोकांना माहिती होतात. काल दीपक केसरकरांनी एक विधान केलं आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. हे बोलणं कुणाला लागू पडतंय ते बघावं. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले असं केसरकर म्हणाले आहेत. मी त्याचा आता शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“लवकरच कठोर पावलं…”, संजय राऊतांचं सूचक विधान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात वातावरण आणखीन तापणार?

“फ्रीजच्या आकाराचे खोके कोण पचवू शकतं?”

दरम्यान, केसरकरांच्या आरोपांवर बोलताना एकनाथ शिंदेंनी फ्रीजच्या आकाराच्या कंटेनरमधून पैसे पोहोच झाल्याची अप्रत्यक्ष टीका केली. “सगळ्या जगाला माहिती आहे की हे जे बोलतायत, ते छोटे छोटे खोके आहेत. मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? फ्रीजएवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात आणि ते कोण पचवू शकतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सगळं जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी हे सूचक विधान केलं आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मला वाटलं होतं, त्यांना नैराश्य उशीरा येईल, पण..”

दरम्यान, उद्धव ठाकरेंना नैराश्य आल्याची टीका एकनाथ शिंदेंनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात केलेल्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता एकनाथ शिंदेंनी त्यावरून टीकास्र सोडलं. “त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय. मला वाटत होतं की नैराश्य यायला त्यांना फार वेळ लागेल. पण ते आधीच आलं आहे”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.

‘तर उठाव होणारच!’ राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी करत संभाजीराजेंचा इशारा, म्हणाले “भावना समजत नसतील तर…”

“यापूर्वीही महाराष्ट्रात एक नकारात्मकता होती. ते वातावरण आम्ही सरकार बनवल्यानंतर बदललं आहे. एक सकारात्मकता तयार झाली आहे. आमच्या सरकारबद्दल लोकांचं मत चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसतायत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde mocks uddhav thackeray sanjay raut shivsena pmw
First published on: 27-11-2022 at 12:13 IST