scorecardresearch

“…हा एकप्रकारे देशद्रोहच आहे”, राहुल गांधींवर टीका करताना एकनाथ शिंदेंचं विधान!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

eknath shinde and rahul gandhi
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडेच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. मोदी समुदायाच्या अवमानप्रकरणी राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी माफी मागण्याबद्दल विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, “माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे, गांधी कुणाची माफी मागत नाही.” राहुल गांधींच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे.

सावरकरांच्या अवमान प्रकरणावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पत्रकार परिषद घेत निषेध व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध करावा तितका थोडा आहे. ते वारंवार सावरकरांचा अवमान करत आहेत. त्यांची सावरकर होण्याची लायकी नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी निषेध व्यक्त केला.

हेही वाचा- “वीर सावरकरांचा राहुल गांधींकडून अपमान, बाळासाहेबांप्रमाणे प्रतिमेला जोडे..?” एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे म्हणाले, “राहुल गांधींच्या कृत्याचा आणि त्यांच्या वृत्तीचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सगळ्यांनीच त्यांचा निषेध करायला हवा होता. ज्यांनी सावरकरांचा अवमान केला, ते वारंवार सांगत आहेत की, मी सावरकर नाही, मी गांधी आहे. पण सावरकर होण्याची तुमची लायकीदेखील नाही. सावरकरांचा त्याग तुमच्यामध्ये नाही, मग तुम्ही सावरकर कसं काय होऊ शकता? सावरकर व्हायला त्याग आणि देशाबद्दल प्रेम असायला हवं.”

हेही वाचा- “…तर राहुल गांधींच्या फोटोला चपलेनं बडवणार का?”, राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

राहुल गांधींना उद्देशून एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “तुम्ही तर परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं या देशाचं दुसरं दुर्दैव काय असू शकतं. तुम्ही देशाची लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी परदेशात जाऊन बोलत आहात. आपल्या देशात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणं, हे आपण समजू शकतो. पण आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं, याचीही निंदा करावी तेवढी कमी आहे. खऱ्या अर्थाने हा एकप्रकारे देशद्रोहच आहे.”

राहुल गांधी यांची लायकी आहे?

राहुल गांधी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून दाखवावं. मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही गांधी आहे. ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 16:39 IST

संबंधित बातम्या