विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे, सरकारचे काम मात्र लोकहिताचे निर्णय घेण्याचे आहे असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगलीत केला. नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण बिनखात्याच्या मंत्र्याकडून होत असल्याची टीका नुकतीच केली होती. या टीकेवर प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधी पक्षांना लक्ष्य केलं. “पहिल्यांदा अशी परिस्थिती आली आहे की बिनखात्याच्या मंत्र्यांकडून ध्वजारोहण होणार आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केल्याचा संदर्भ देत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

विरोधक या नात्याने टीका करणे हे कामच त्यांचे आहे. मात्र, सरकार लोकहिताचे निर्णय घेत असून याची प्रचिती गेल्या महिनाभरात घेण्यात आलेल्या निर्णयावरून आली आहे, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं. “आरोप करणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. आमचं काम आहे सरकार चालवणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणे. एका महिनाभरात आम्ही जनहिताचे किती निर्णय घेतले ते आपल्या सर्वांना ठाऊक आहे,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता सरकार घेत आहे. पुरामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. पूरस्थितीत हानीग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन करण्यात येत असून सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या सुरक्षेसाठी सरकार लक्ष ठेवून आहे. प्रशासनाला आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.