Ladka Bhau Yojana in Maharashtra : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच सर्व आमदार जिंकून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही दोन आमदार विजयी झाले. अजित पवार गटाकडे अवघे ४२ आमदार होते. परंतु, तरीही त्यांना ४७ मते मिळाली आहेत. त्यामुळे उर्वरित पाच मते अपक्ष आणि काँग्रेसकडून फुटली असण्याची शक्यता आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पावसाळी अधिवेशाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर निशाणा साधला. तसंच, लाडका भाऊ योजनेवरूनही (Ladka Bhau Yojana) विरोधकांना कानपिचक्या दिल्या. "आपण महायुतीचं गणित नीट केलं. आपण ठरवलं की आपले तिघांचेही उमेदवार जिंकून आले पाहिजेत. पण यात कोणी किती मते घ्यायची, कोणी कोणाला पाडायचं हे महाविकास आघाडीत सुरू झालं. तिथंच बिघाडी झाली. आता काय आहे लाडकी बहीण योजना आहे. त्यावरून लाडका भाऊ योजना काढा म्हणालं कोणीतरी. सख्ख्या भावाला कधी जवळ त्यांनी केलं नाही, आणि म्हणतात की लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana) काढा." हेही वाचा >> Ladka Bhau Yojana : दर महिन्याला ६ ते १० हजार विद्यावेतन, सरकारची आणखी एक योजना "आम्ही लाडका भाऊ योजनाही काढली. दहा हजारांपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना अप्रेंटनशिप महिन्याला देणार, डिप्लोमा होल्डरला ८ हजार आणि बेरोजरांगाना स्टायपेंड देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या विकेट तुमच्या अशा जाणारच आहेत. तुम्ही म्हणालात की आम्ही सुडाचं राजकारण केलं. पण अडीच वर्षात तुम्ही किती सुडाचं राजकारण केलं?", असंही एकनाथ शिंदे म्हणाले. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. तसेच शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी राज्यात सुडाचं राजकारण केलं होतं. भाजपा नेते नारायण राणे मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले म्हणून त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली. हनुमान चालीसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. देशद्रोहाचे कलम लावून त्या दोघांना १२ दिवस तुरुंगात डांबलं. अभिनेत्री कंगणा रणौतचं घर तोडलं. तिच्याविरोधातील खटला लढण्यासाठी वकिलांना ८० लाख रुपये त्यांचं शुल्क म्हणून दिले. नौदलाच्या अधिकाऱ्याला मारलं. हे सगळं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुडाचं राजकारण होतं.” महाराष्ट्रात खरंच लाडका भाऊ योजना आणली आहे का?(Ladka Bhau Yojana in Maharashtra?) महाराष्ट्रात प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित नाही. परंतु, राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली आहे. राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ महाराष्ट्र शासनाने २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. प्रशिक्षणार्थींना १२ वी पास ६ हजार, आयटीआय/पदविका ८ हजार आणि पदवीधर, पदव्युत्तर यांना १० हजार प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. परंतु, ही योजना फक्त राज्यातील केवळ तरुणांपुरतीच मर्यादित नसून तरुणीही या योजनेस पात्र आहेत.