Eknath Shinde : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक दोन महिन्यांवर आली असल्यामुळे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सद्या राज्यातील जवळपास सर्वच नेत्यांचे दौरे सुरु आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून आढावा बैठका, सभा, मेळावे, उमेदवारांची चापपणी, मतदारसंघाचा आढावा, असं सर्व काम सध्या सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या दौऱ्यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. राज्यातील महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने टीका-टिप्पणी सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही योजना निवडणुकीच्या तोंडावर सरकारने आणली असल्याची टीका होत आहे. तर या टीकेला सत्ताधारी नेत्यांकडूनही जशास तसं उत्तर दिलं आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'लाडकी बहीण योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा', अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं. मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले? "काही सावत्र भाऊ तुम्हाला पैसे मुळू नये, म्हणून प्रयत्न करत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालण्याचं काम ते करत आहेत. पण त्यांना जोडा दाखवा. विरोधी पक्षातील काहीजण लाडकी बहीण योजनेच्या विरोधात न्यायालयातही गेले होते. मात्र, न्यायालयानेही त्यांना चपराख दिली. विरोधकांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. आता लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांना या योजनेचे पैसे देण्यास सुरुवात देखील झाली आहे. महाराष्ट्रातील आमच्या बहिणी हुशार आहेत. त्यांना देणारे कोण आणि घेणारे कोण? हे माहिती आहे", असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. हेही वाचा : शरद पवारांबरोबर पुन्हा जाणार का? अजित पवारांचं फक्त दोन शब्दांत उत्तर; म्हणाले… खासदार अमोल कोल्हे काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली. अमोल कोल्हे म्हणाले, "४० पैशांचे काही लावारीस भक्त सोशल मीडियावर तीन हजार रुपये आले म्हणून पोस्ट शेअर करत आहेत. आता तुम्हाला एक गंमत पाहायची असेल तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर एकूण ३२ लाख अर्जांची संख्या आहे. पण पोर्टलवर मंजूर असलेल्या अर्जाची संख्या फक्त १९ आहे. तरीही काही भक्त सोशल मीडियावर सांगत आहेत पैसे आले. कारण ही फक्त लाडकी बहीण योजना नाही तर लाडकी पडदा योजना आहे", अशी खोचक टीका अमोल कोल्हे यांनी केली.