“२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”

“आपली युती झालेली होती, मग त्यावेळी नकार देऊन मला मुख्यमंत्री व्हायला कशाला भाग पाडले?,” असा प्रश्नही ठाकरेंनी भाजपाला विचारला होता.

“२०१९ मध्येच भाजपाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर…” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “आम्ही कुठे…”
विशेष मुलाखतीमध्ये शिंदेंनी दिली यावर प्रतिक्रिया

भाजपाने शिवसेनेमधील बंडखोर गटाला समर्थन देत बंडखोर आमदारांचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांपूर्वी युतीमध्ये मतभेद निर्माण होण्याआधीच हे केलं असतं तर अधिक चांगलं झालं असं म्हणत खंत व्यक्त केलीय. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनीही अडीच वर्षांपूर्वी याच मुद्द्यावरुन शिवसेना भाजपामध्ये मतभेद झाल्याचं म्हटलंय. मात्र शिवसेनेकडून आता अडीच वर्षांपूर्वीच्या मागणीचा उल्लेख होत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य केलं आहे.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण एकनाथ शिंदेंनी…

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर धक्कादायक राजकीय घटनाक्रमांत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे शिवसेना-भाजपचे सरकार आहे, असा दावाही शिंदे-फडणवीस यांनी केला. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी शिवसेना भवनमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, राज्यात नवे सरकार आल्यावर तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री म्हणून भाजपला पाठिंबा द्यावा लागला ते पाहता २०१९ मध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावे या अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतील प्रस्तावाची अंमलबजावणी झाली असती तर आज ही वेळ आली नसती असं म्हटलं.

नक्की वाचा >> “मराठा म्हणून एकनाथ शिंदेंनी…”; महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं वक्तव्य

“त्यावेळी ऐकले असते तर आज हेच सारे सन्मानाने झाले असते. लोकसभा-विधानसभेसाठी युती होत असताना हेच ठरले होते. आपली युती झालेली होती, मग त्यावेळी नकार देऊन मला मुख्यमंत्री व्हायला कशाला भाग पाडले?,” असा प्रश्नही ठाकरेंनी भाजपाला विचारला. “भाजपाने आमचे ऐकले असते तर महाविकास आघाडी स्थापनही झाली नसती आणि अडीच वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री राहिला असता. आता तर पाचही वर्षे भाजपाचा मुख्यमंत्री नाही, असे सध्याचे चित्र आहे. आमचे ऐकले असते तर अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री राहिला असता. या साऱ्यात भाजपला काय आनंद मिळाला समजत नाही,” असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

नक्की वाचा >> “पुढील अडीच वर्ष हे सरकार नक्की चालणार, कारण आमच्याकडे…”; मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला विश्वास

उद्धव यांनी अडीच वर्षांचा मुद्दा उपस्थित केल्याचा संदर्भ देत ‘इंडिया टुडे’च्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, “आम्ही कुठे वेगळा रस्ता निवडलाय? आम्ही तोच मार्ग निवडलाय. शिवसेना-भाजपाची युती होती. आम्ही एकत्र निवडणूक लढलो. आमच्याकडे सध्या शिवसेनेतील दोन तृतीयांशपेक्षा जास्त सहकारी आहेत. आम्ही भाजपासोबत आहोत,” असं शिंदेंनी सांगितलं. “आम्ही एक मजबूत सरकार देत आहोत. (हे सरकार स्थापन करुन) आम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलेलं नाही,” असंही शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> सकाळीच आलेला अमित शाहांचा फोन, मराठा- ब्राह्मण समीकरणं अन् फडणवीसांच्या हातून निसटलेलं मुख्यमंत्रीपद; जाणून घ्या घटनाक्रम

हे ईडी सरकार…
“काँग्रेसचं म्हणणं आहे की हे ईडीचं म्हणजेच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे,” असं म्हणत पत्रकाराने शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावरुन प्रिक्रिया देताना शिंदेंनी, “यावर मी काही बोलू इच्छित नाही. आमचे ते ५० आमदार वेगळी भूमिका स्वीकारतात. ते सत्तेतून बाहेर जातात. सामान्यपणे कोणी सत्ता सोडू पाहत नाही. पण आम्ही सत्तेतून बाहेर गेलो याचं कारण काय आहे? याचं सर्वांनी आत्मपरिक्षण करणं गरजेचं आहे,” असा टोला शिंदेंनी लगावला.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंच्या ‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’ प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याबद्दल…”

“आमदारांना अडीच वर्षात जे अनुभव आले ते पाहता त्यांनी एक नवा मार्ग निवडला. प्रत्येकाला आपल्या मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे. मात्र त्यांना ती करता येत नव्हती. सरकारमध्ये असूनही काम करता येत नव्हती म्हणून ते नाराज होतो आणि त्यामुळेच ते बाहेर पडले,” असंही शिंदे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm eknath shinde on uddhav thackeray saying bjp should have agree to have half term cm of shivsena in 2019 alliance scsg

Next Story
‘मलाही गुवाहाटीची ऑफर आली होती, पण….’,संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी