निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत कागदोपत्री सिद्ध करा, असे निर्देश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. यावरुन आता उद्धव ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. प्रवक्ते संजय राऊत यांच्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका करताना, ‘वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर’ असा टोला लगावला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला विद्यमान मुख्यमंत्र्यांनी काही तासांमध्येच उत्तर देताना, बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते ते आमच्या वडिलांसारखेच होते असं म्हटलं.

नक्की पाहा >> Photos: …अन् आदित्य ठाकरेंनी त्यांच्या डोक्यावर छत्री पकडली; नंतर त्यांनी फडणवीसांवर टीका करत म्हटलं, “सात वर्षात एकदाही…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार अरविंद सावंत यांच्या मुंबईतील शिवडी येथील शिवसेना शाखेचे उद्घाटन रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. यानिमित्त शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. हिंमत असेल तर माझ्या वडिलांचा फोटो न लावता निवडणूक लढवा. ही बंडखोरी नव्हे तर हरामखोरी आहे, अशा शब्दात उद्धव यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. याच टीकेवरुन वांद्रे येथील रंगशारदा सभागृहाबाहेर पत्रकारांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या संदर्भाने केलेल्या टीकेला उत्तर दिलं.

नक्की वाचा >> ‘खंजीर खुपसला’ टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर; म्हणाले, “जे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बेड्यांमध्ये…”

उद्धव नेमकं काय म्हणाले?
“त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: निवडणूक आयोगाने बहुमताचा पुरावा सादर करण्याचे आदेश दिल्यानंतर राऊत म्हणतात, “वरुन बाळासाहेबांचा आत्मा…”

“तुम्हाला वडील चोरायचे आहेत. पक्षही चोरायला निघाले आहात. तुम्ही कसले मर्द आहात. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्र, मुंबई आणि तुमचे आयुष्ये देणार आहात का? न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. पण हे सगळं कारस्थान आहे, त्याला जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. मला प्रत्येक पदाधिकाऱ्याचे शपथपत्र हवे आहे. माझ्यासह गटप्रमुखाचे शपथपत्र पाहिजे,” असं उद्धव म्हणाले होते.

नक्की वाचा >> नेमकं राष्ट्रपती कोण झालंय? मुर्मू यांचं अभिनंदन करणारी मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट पाहून लोकांना पडला प्रश्न; फोटो ठरतोय चर्चेचा विषय

शिंदे काय म्हणाले?
वडील चोरण्याचं वक्तव्य करत उद्धव यांनी केलेल्या टीकेवरुन शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला असताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे हे बंडखोरांसाठी वडिलांप्रमाणेच असल्याचं म्हटलं. “मला या बाबतीत कोणावरही टीका करायची नाही. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललोय.
त्या विचारांना आम्ही पुढे नेतोय हे महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलं आहे. त्यामुळेच आम्हाला राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आणि तालुक्यांमधून येऊन लोक समर्थन देत आहेत,” असं शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> “एका रिक्षावाल्याकडे कोट्यवधी रुपये कुठून आले?” आदित्य ठाकरे मंचावर असतानाच जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

“आम्ही बाळासाहेबांच्या विचारांची जी भूमिका घेतलेली आहे ती राज्याला पुढं घेऊन जाईन, एवढेच मी या प्रसंगी सांगतो बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. शिवसेनेकडे ते कुटुंब म्हणून पाहत होते. म्हणून आम्ही त्यांच्याकडे कुटुंबप्रमुख या नात्याने पाहतोय. बाळासाहेब एक महापुरुष होते. त्यांच्या आशीर्वादामुळेच हे सरकार स्थापन झालेलं आहे,” असंही शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> ‘हे सरकार बेकायदेशीर असून लवकरच कोसळणार’ म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर; म्हणाले, “ज्यांना स्वत:चं…”

“हे सरकार अडीच वर्षापूर्वीच स्थापन व्हायला पाहिजे होते. त्याची दुरुस्ती आता आम्ही केलीय. निवडणुकपूर्व युती केली होती. त्यावेळेस शिवसेना-भाजपा युतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वीच स्थापन करायला पाहिजे होतं. मात्र दुर्देवाने जे झालं नाही ती दुरुस्ती आता आम्ही केलीय,” असंही शिंदे म्हणाले. “बाळासाहेब आमचे कुटुंबप्रमुख होते. ते ही आम्हाला कुटुंबातलं मानत होते. कुटुंबप्रमुखाप्रमाणे आम्हाला त्यांचा आदर वाटतो. ते आम्हाला वडिलांप्रमाणेच होते. त्यामुळे हे असं म्हणणं योग्य वाटत नाही. त्यांना काय म्हणायचंय हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे,” असं म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया नोंदवली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde on uddhav thackeray saying rebels trying to stole my father balasahebs legacy scsg
First published on: 25-07-2022 at 08:14 IST