अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते? मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”

बहुमत चाचणीच्या दिवशी एकनाश शिंदेंसोबत विधानसभेमध्ये प्रवेश करत बांगर यांनी ठाकरेंना मोठा धक्का दिला होता

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आमदार बांगर ठाकरेंसोबत राहून काय करत होते? मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर सभेत केला खुलासा; म्हणाले, “तो मागे…”
हिंगोलीमधील जाहीर सभेत शिंदेंचं विधान

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकाराने सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या हिंगोलीमधील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बांगर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. जाहीर भाषणामध्ये संजय बांगर यांनी जमवलेल्या गर्दीबद्दलही शिंदे यांनी समाधान व्यक्त करताना सभेला आलेल्याचे आभार मानले. विशेष म्हणजे शिंदे गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी म्हणजेच बहुमत चाचणीच्या काही तास आधी दाखल झालेले बंडखोरांपैकी ४० वे शिवसेना आमदार अशी ओळख असणारे बांगर अगदी शेवटी शिंदे गटात का आले, ते ठाकरे गटात काय करत होते याबद्दलही शिंदेंनी या भाषणात भाष्य केलं.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

भाषणाच्या सुरुवातीलाच शिंदेंनी संतोष बांगर यांनी सभेसाठी जमलेली गर्दी पाहून आश्चर्य वाटल्याचं सांगितलं. “खऱ्या अर्थाने तो लोकांमध्ये जातो आणि बोलतो हे पाहून ही समोरची गर्दी पाहून त्यांची लोकप्रियता समोर आली आहे. चालायला रस्ता नव्हा एवढी गर्दी, मुंगीलाही शिरायला जागा नाही अशी स्थिती आहे. या भागात अनेक वर्ष आपण संतोष सोबत काम करत आहात,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी संतोष बांगर यांचं कौतुक केलं. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेना सोडून जाऊ नका असं भाषण व्हायरल झालेल्या बांगर यांनी आपल्या गटामध्ये प्रवेश का केला याबद्दलही शिंदेंनी भाष्य करताना बांगरे हे आपले आवडते चेले असल्याचं म्हटलं. हे ऐकून बांगर समर्थकांनी एकच जल्लोष केला. तर या वाक्यानंतर शिंदेंच्या मागे उभ्या असणाऱ्या बांगर यांच्या चेहऱ्यावरही हास्य खुलल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> “बाळासाहेब म्हणाले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी…”; शिंदे सरकार ‘बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार’ असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांचं विधान

बांगर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात भाष्य करताना शिंदेंनी, “त्यावेळी काही लोक म्हणाले, अरे संतोष बांगर कुठे राहिलाय? कुठे थांबलाय? का येत नाही? पण मी सांगू इच्छितो की संतोष बांगर हा एकनाथ शिंदेंचा आवडता चेला आहे,” असं म्हटलं. त्यानंतर बांगर समर्थकांनी टाळ्या आणि आरडाओरड करुन मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला दाद दिली. पुढे मुख्यमंत्री शिंदेंनी बांगर हे इतक्या दिवस ठाकरे गटामध्ये का थांबले होते याबद्दल हसत भाष्य केलं. “तो मागे थांबला होता. तो एक एकाला पुढे पाठवत होता. परत चाल… परत चाला सांगत,” असं शिंदे म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: मंत्रीमंडळ विस्तारानंतर शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढेल आणि…; भाजपाला वाटत आहे भीती

तसेच शिंदेंनी बांगर यांच्या व्हायरल झालेल्या भाषणाबद्दलही यावेळेस भाष्य केलं. “त्याने इथे येऊन जे भाषण केलं त्यामुळे सर्वजण खूश झाले. पण त्यांना माहिती नाही की त्याच्या मनामध्ये काय होतं. बरोबर जेव्हा आवश्यकता होती तेव्हा त्याने त्याचा पत्ता उघडला. त्याने बाळासाहेबांच्या शिवसेनेची भूमिका घेतली. मग सभागृहामध्ये त्याने योग्य निर्णय घेतला. मी त्याचं मनापासून स्वागत करतो,” असं शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान

संतोष बांगर यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी विधानसभेत एकनाथ शिंदेंसोबत प्रवेश करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. बहुमत चाचणीच्या वेळेस बांगर यांनी शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केलं होतं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Petrol-Diesel Price on 9 August 2022: इंधनांच्या किंमतीमध्ये वाढ; जाणून घ्या आजचे दर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी