राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असं म्हटलंय. प्रसारमाध्यमांशी राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भात बोलताना शिंदेंनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यामधील सत्तासंघर्षासंदर्भातून गुवाहाटीचा उल्लेख करत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शिंदेंनी त्यांनी आमची बदनामी केली होती असंही म्हटलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणाऱ्या शिंदे यांनी औरंगाबादमध्ये राविवारी रात्री प्रसारमाध्यमांशी राऊतांविरोधात ईडीने केलेल्या कारवाईसंदर्भात चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी, “त्याबद्दल चौकशी सुरु आहे. चौकशी अंती माहिती समोर येईल,” असं तपासासंदर्भात म्हटलं. यावेळी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारताना, “ते बऱ्याच जणांना तुरुंगात टाकण्यासाठी निघाले होते. तुम्ही गुवाहाटीला असताना…” असं म्हणत असतानाच पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असताना प्रश्न पूर्ण होण्याआधीच शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी आम्हाला पण तुरुंगात घालण्याचा विचार केला होता. आमची देखील बदनामी केली,” असं शिंदे म्हणाले. पुढे बोलताना शिंदे यांनी, “ठीक आहे, आम्ही ते विसरुन गेलो. या सर्वांना मी आगोदरच सांगितलं की समोरच्याने खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्याने आम्ही तसं करणार नाही. आम्ही त्यांना कामातून उत्तर देऊ” असंही म्हटलंय.

दरम्यान, रात्री केलेल्या या चर्चेच्या आधी शिंदेंनी खोचक शब्दांमध्ये राऊत यांच्यावर टीका केली होती. सक्तवसुली संचालनालयाच्या भीतीने अथवा दडपणामुळे आमच्याकडे व भाजपाकडे येण्याचे ‘पुण्यकाम’ करू नका, असा सल्ला देत मुख्यमंत्री शिंदेंनी यांनी संजय राऊत यांना ‘कर नाही तर डर कशाला’ असा तिरकस टोला लगावला. संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने रविवारी छापा टाकला. त्यामुळे राज्यात सुरू असणाऱ्या चर्चेबाबत याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले की, ‘ईडी’ची भीती दाखवून शिंदे गटात व भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “राऊत यांना कोणी बोलावले नाही. त्यांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी चालू आहे. त्यात त्यांचा दोष आहे की नाही, हे समजेल. राऊत स्वत:च ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणायचे,” अशी आठवणही शिंदेंनी करुन दिली.

“महाविकास आघाडीचे ते मोठे नेते होते. तुम्ही रोज सकाळी त्यांना टीव्हीवर दाखवत असत; पण आम्ही सुडाचे राजकारण करत नाही. तसे केले असते तर न्यायालयाने सरकारला फटकारले असते; पण तसे घडत नाही. त्यामुळे चौकशी हा स्वतंत्र विषय आहे; पण अशी भीतीमुळे आलेली माणसे आमच्याकडे नकोत. मी पुन्हा एकदा जाहीर आवाहन करतो आहे की, कोणाच्या मागे यंत्रणा लागली असेल तर आमच्याकडे व भाजपाकडे येऊ नका,” असंही शिंदे म्हणाले. कोणावर तरी दबाव टाकून कोणालाही आमच्यात घेतलेले नाही. अर्जुन खोतकर यांचा प्रवेश या दबावातून असल्याची चर्चा सर्वत्र होती. मात्र अर्जुन असो वा कोणी असो, असे दबावाने कोणाला आमच्यात घेतले नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde reacts on arrest of sanjay raut by ed says he tried arresting us also scsg
First published on: 01-08-2022 at 10:01 IST