राज्यातील शिंदे-ठाकरे संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. दोघांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आज मुंबईतील गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीवारीवरून टीका केली. तसेच वेदान्तावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सत्तेत असताना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी एकातरी गटप्रमुखाला रोजगार दिला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी विचारला आहे. दिल्लीत आयोजित राज्य प्रमुखांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात; म्हणाले, “ज्यांना सत्तेचं दूध पाजलं…”

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज मुंबईत गटप्रमुखांचा मेळावा झाला. अडीच वर्ष सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना गटप्रमुखांची कधीही आठवण आली नाही. गटप्रमुखांना अडीच वर्षात काडीचीही किंमत नव्हती. कोणालाही मातोश्री किंवा वर्षावर प्रवेश नव्हता. आम्ही उठाव केल्यानंतरच शिवसैनिकांना चांगले दिवस आले. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. अडीच वर्षात तुम्ही किती लोकांना रोजगार दिला. एकातरी गटप्रमुखाला रोजगार मिळाला का? तालुका प्रमुखांना, जिल्हा प्रमुखांना मुंबईत बोलावलं जात होतं. त्यांना खर्चदेखील परवडत नव्हता. तेव्हा मी नगरविकास मंत्री असताना त्यांना लाखो रुपयांचे फंड देऊन काम करण्यास सांगितले, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

“देशभरातील राज्यप्रमुखांना अपमास्पद वागणूक दिली”

आज आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अडीच महिन्यांपूर्वी राज्यात परिवर्तन अतिशय महत्त्वाचे होते. अनेकांना आम्हाला येऊन हे सांगितले होते. त्यानुसार आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणले. आमच्या या उठावाची दखल संपूर्ण जगाने घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील नव्हे, तर देशभरातील शिवसैनिक आणि राज्यप्रमुखाला अपमास्पद वागणूक दिली जात होती. अनेकांना आम्हाला येऊन याबाबतची माहिती दिली, असेही ते म्हणाले.

“खुर्चीच्या लालचेपोटी विचारांशी गद्दारी केली”

राज्यात आम्ही भाजपा-शिवसेना युतीत निवडणूक लढवली होती. मात्र, निकालानंतर कोणाला विश्वास बसणार नाही, असे घडले. इतकी वर्ष ज्यांच्याविरोधात आपण लढलो, त्यांच्या बरोबरीने आपल्याला सत्तेत बसायला लागलं. एका मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या लालचेपोटी हे सर्व घडलं, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

हेही वाचा – “तेव्हा गिधाडं कुठे होती?” अमित शाहांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

“लोकांना तुम्ही नोकर समजता का?”

आम्ही सर्व बाळासाहेबांच्या विराचारांवर चालणारे लोकं आहोत. शिवसेना हा पक्ष खासगी कंपनी नाही. हा बाळासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे. आम्ही या विचारांना कधीही तडा जाऊ देणार नाही. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रक्ताचे पाणी करून हा पक्ष मोठा केला आहे. मात्र, याच लोकांना तुम्ही नोकर समजाल, तर हे आता चालणार नाही. आज अनेक लोकं आम्हाला पाठिंबा देत आहेत. मात्र, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे, असा आरोपही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. आम्हाला नेहमी गद्दार म्हटल्या जाते. मात्र, आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो आहे, तर तुम्हीला सत्तेच्या लालचे पोटी शिवसैनिकांशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. त्यामुळे आम्ही गद्दार नसून गद्दारी तुम्ही केली. असे प्रत्युत्तर त्यांनी उद्धव ठाकरेंना दिले.