शिंदे- फडणवीस सरकारने काल बहुमत चाचणी जिंकली. विश्वास ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं भाषण चांगलचं गाजलं. टोलेबाजी करत एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना चांगलचं प्रत्युत्तर दिलं. शिंदेंच्या या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाला म्हणत एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता. तर ठाकरेंच्या या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला, कारण हे सर्वसामान्यांच सरकार आहे’. असं म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज महिला आघाडी बैठक घेतली होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला होता. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. ब्रेकच लागत नव्हता. एकनाथ शिंदेंच भाषण सुरु असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेंन्शन होतं, की अपघात तर होणार नाही ना. काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक खेचला. पुढे काय काय खेचतील सांगता येत नाही. असा टोला ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला होता.

देवेंद्र फडणवीसांचेही ठाकरेंना प्रत्युत्तर
रिक्षावाला टिकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कॉग्रेसने पंतप्रधान मोदींना चायवाला म्हणून हिणवले होते. आज कॉग्रेसची काय अवस्था आहे आपण बघतोय. मोदींनी त्यांच्यावर पाणी पिण्याची वेळ आणली आहे. आम्ही रिक्षेवाला असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पान टपरी, चहा टपरी किंवा रिक्षेवाले असलो तरी आम्हाला अभिमान आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनी हे समजून घ्यावं, की नरेंद्र मोदींच्या काळात सामान्य माणूस राजा होईल, असा टोला फडणवीसांना उद्धव ठाकरेंना लगावला आहे.